नागपूर:-एका बत्तीस वर्षांच्या तरुणाला हे खोके सरकार घाबरले आहे. घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप गुरुवारी आदित्य ठाकरे यांनी केला. शिवाय सरकारला काय चौकशी करायचीय ती करू द्या, असे आव्हानही त्यांनी दिले.
विधिमंडळात आज सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरण गाजले. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरूयत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी ‘एसआयटी’ चौकशीची घोषणा केली. त्यानंतर प्रथमच समोर येत आदित्य यांनी प्रतिक्रिया दिली.
खोके सरकार घाबरले
विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, एका बत्तीस वर्षांच्या तरुणाला खोके सरकार घाबरले आहे. सर्वांना माहितीय. घोटाळेबाज गद्दार मुख्यमंत्री ज्या केसमध्ये सापडलेत, ते सभागृहात काढण्यापासून रोखतायत. सत्ताधारीच वेलमध्ये येतातयत. विरोधकांना बोलू दिले जात नाही. एवढ्या वर्षात असे चित्र कधीच दिसले नाही, असा आरोप त्यांनी केला.
भाज्यपालांना वाचवण्याचा प्रयत्न
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा फुले यांचा अपमान केला. त्या राज्यपाल हटावची मागणी आम्ही केली. मात्र, त्या भाज्यपालांना आणि घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरूय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते ‘एनआयटी’ घोटाळा काढू देत नाहीत. त्यामुळेच हे सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.
चौकशी करायची ती करा
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, जी चौकशी करायची ती करा. यांच्यात नाव घेण्याची हिंमत नाही. मात्र, एका बत्तीस वर्षांच्या तरुणानं खोके सरकारला हलवून ठेवलंय. सध्या हुकूमशाही सुरूय. हे लोक घाबरलेत. ते स्वतःच्या तरुण मुलांची अशी बदनामी सहन करू शकतील का, असा सवालही त्यांनी केला. आपण विधानभवनात कधीही असे पाहिले नव्हते, असा दावा त्यांनी केला