लोकनेते विलासराव देशमुख: विकासाची दूरदृष्टी असलेले
दिलखुलास व्यक्तिमत्व, एक निष्ठावंत राजकारणी
महाराष्ट्राच्या राजकारणात दूरदृष्टी, अभ्यासू वृत्ती आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून
ओळखले जाणारे लोकनेते विलासराव देशमुख हे एक असे नेते होते, ज्यांनी सरपंचपदापासून ते
राज्याच्या सर्वोच्च मुख्यमंत्रीपदापर्यंत तसेच केंद्रीयमंत्रीपदा पर्यंत प्रवास केला. त्यांच्या दिलखुलास
स्वभावाने त्यांनी केवळ मित्रच नव्हे, तर राजकीय विरोधकांनाही आपलेसे केले. हा त्यांचा गुण
संसदीय लोकशाहीची ऊंची वाढवणारा आहे, त्यांच्या वक्तृत्वाची, भाषणाची खास शैली आणि
शब्दांवरील पकड आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या १३ व्या स्मृतिदीनानिमित्त त्यांच्या
कार्याचे स्मरण करणे आणि त्यांचे विचारकार्य पूढे घेऊन जाणे हीच खरी त्यांना आंदराजली ठरेल.
आदरणीय विलासराव देशमुख यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात १९७४ मध्ये
बाभळगावच्या सरपंचपदापासून झाली. त्यानंतर त्यांनी पंचायत समिती उपसभापती आणि जिल्हा
परिषद सदस्य अशी विविध पदे भूषवली. १९८० मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून
आले. १९९५ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, जो सर्वांसाठी एक मोठा धक्का होता. मात्र,
यानंतरही त्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात दमदार पुनरागमन केले. ते दोन वेळा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९९९-२००४ आणि २००४-२००८). त्यांच्या कार्यकाळात राज्याच्या
पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली. त्यांनी सार्वजनिक वाहतूक, रस्ते आणि
जलसंधारणाच्या योजनांवर भर दिला. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शैक्षणिक सुधारणा, कृषी
विकासाच्या योजना आणि सामाजिक न्यायाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, ज्यामुळे
सर्वसामान्यांच्या जीवनात सुधारणा झाली.
आपण पाहतो आजकाल राजकारणाचा चेहरामोहरा बदलताना दिसतो आहे. सत्तेसाठी पक्षांतर
करणे, विचारांना तिलांजली देणे आणि खुर्चीलाच सर्वोच्च मानणे हे राजकारणाचे नवीन सूत्र बनले
आहे. पक्षनिष्ठा, वैचारिक बांधिलकी या गोष्टी जणू कालबाह्य झाल्या आहेत, असेच वाटत आहे.
अशा परिस्थितीत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे स्मरण होणे स्वाभाविक
आहे. त्यांनी राजकारण केवळ सत्तेचे साधन न मानता, जनतेची सेवा करण्याचे माध्यम मानले.
आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत, विलासराव देशमुख यांनी काँग्रेस पक्ष आणि त्याच्या
पुरोगामी विचारधारेला कधीही सोडले नाही. त्यांच्यासाठी पक्षनिष्ठा ही केवळ एक राजकीय सोय
नव्हती, तर ती एक नैतिक बांधिलकी होती. त्यांनी काँग्रेसच्या विचारांचा वापर राज्याच्या आणि
लोकांच्या विकासासाठी केला. त्यांच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय आणि भूषवलेली पदे पाहिली
तर याची प्रचिती येते.
विलासराव देशमुख यांनी राजकारणाची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून केली.
यामुळे त्यांना ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांचे प्रश्न जवळून समजून घेता आले. सहकार
संस्थांचा वापर केवळ आर्थिक विकासासाठीच नव्हे, तर सामाजिक बदलांसाठी कसा करता येतो,
हे त्यांनी दाखवून दिले. स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देऊन त्यांनी समाजकारणालाही पाठिंबा
दिला. विधानसभा आणि संसद ही केवळ चर्चा करण्याची ठिकाणे नसून, लोकांच्या कल्याणासाठी
निर्णय घेणारी पवित्र मंदिरे आहेत, अशी त्यांची धारणा होती. या सर्व स्तरांवर काम करताना
त्यांनी काँग्रेसची विचारधारा जपली आणि ती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
विलासराव देशमुख यांचे राजकारण हे स्वार्थावर आधारित नव्हते, तर ते पक्षनिष्ठा, विकास
आणि लोककल्याण या तत्त्वांवर आधारित होते. आजच्या अस्थिर राजकीय परिस्थितीत, त्यांचे
कार्य आणि विचार हे मार्गदर्शक दीपस्तंभासारखे आहेत.
शब्द त्यांचे जणू, विचारांचा झरा,
राजकारणाचा त्यांनीच, बदलला चेहरा.
विचारांशी निष्ठा, पक्षालाच मान,
लोकांच्या कल्याणाचे, ठेवले ध्यान.
आदरणीय विलासराव देशमुख यांचे सहकार क्षेत्रातील कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे.
दुष्काळी मराठवाड्यात त्यांनी सहकार चळवळ रुजवली आणि ती यशस्वी करून दाखवली.
त्यांच्या दूरदृष्टीमुळे मांजरा परिवारातील सहकारी साखर कारखाने आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बँक यांसारख्या संस्था उभ्या राहिल्या. आज या संस्थांमुळे परिसराचा कायापालट झाला
आहे. त्यांच्या प्रयत्नांनी मांजरा काठच्या ऊसाची कांडी सर्वोत्तम दरामुळे सोन्याची कांडी झाली
आहे.
लातूर जिल्ह्याशी त्यांचे नाते अतूट होते. त्यांनी घेतलेल्या प्रत्येक पदाचा उपयोग
लातूरच्या विकासासाठी केला. भूकंपानंतर लातूरच्या पुनर्वसनासाठी त्यांनी केलेले काम
अविस्मरणीय आहे. त्यांनी लातूरला विकासाच्या नवीन दिशेने नेले आणि “जे नवे ते लातूरकरांना
हवे” हा मंत्र प्रत्यक्षात आणला. त्यांच्या नेतृत्वामुळे आणि सहकार महर्षी दिलीपराव देशमुख
यांच्या नियोजनामुळे १६ ऑगस्ट १९८२ रोजी लातूरला जिल्ह्याचा दर्जा मिळाल्यानंतर येथील
विकासाला गती मिळाली. आज माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आणि माजी
आमदार धीरज विलासराव देशमुख हे त्यांच्या या वाटचालीस नवी दिशा देत आहेत.
विचारांची निष्ठा कधीच न सोडली,
राजकारणाची रीत त्यांनीच जोडली.
सहकाराची चळवळ यशस्वी केली,
लातूरच्या विकासाला दिशाच दिली.
मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी भरीव काम केले. त्यांनी गरीब आणि
वंचित घटकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आणि राज्याच्या विविध क्षेत्रांत प्रगती साधली.
देशासाठी त्यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री म्हणूनही महत्त्वाचे योगदान दिले. सर्व समाजाला
सोबत घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत विशेष लोकप्रिय होती. त्यांच्याकडे समाजातील प्रत्येक
घटकासाठी काहीतरी करण्याची तळमळ होती, ज्यामुळे त्यांनी एक व्यापक आणि सर्वसमावेशक
नेतृत्व सिद्ध केले.
आदरणीय विलासराव देशमुख यांनी त्यांच्या कारकिर्दीत घेतलेले अनेक निर्णय राज्याच्या
विकासासाठी मैलाचा दगड ठरले. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली, वीजबील माफ
केले, आणि अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विशेष अनुदान दिले. विदर्भातील
शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी लातूरला शासकीय कृषी
महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आणि विद्यापीठ उपकेंद्र
आणले.
आपण माजी मुख्यमंत्री व माजी केद्रींय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांची १४
ऑगस्ट रोजी १३ वा स्मृतीदीन साजरा करीत आहोत. आदरणीय विलासराव देशमुख यांनी ज्या
ज्या पदावर काम केले तेथून विकासाला गती आणि लोकांच्या कल्याणाला चालना देण्याचे काम
केले. नक्षत्रामध्ये जसे सुर्य उर्जेचा स्त्रोत म्हणून काम करतो तसे राजकारणाच्या नभात
विलासराव देशमुख नावाचे वलय आपल्याला कायम प्रेरणा देत राहणार आहे.
विकासाचे बीज, पेरले त्यांनी,
राजकीय नभात, वलय तेजस्वी.
आजही त्यांचे कार्य, दिशा दावी,
स्मृती ही त्यांची, प्रेरणाच भावी.
आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब या अलौकीक आणि कर्तबगार नेतृत्वाचा आज
स्मृतिदिन आहे, त्यांना मनापासून शत:शा नमन, विनम्र अभिवादन …!
राहूल हरिभाऊ इंगळे पाटील
रा.करकट्टा ता.जि.लातूर
मो. ९८९०५७७१२८
