प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत १९ ऑगस्ट रोजी होणार भव्य सोहळा
लातूर – पत्रकारितेच्या प्रामाणिक वाटचालीला, व्यावसायिक क्षेत्रातील सकारात्मक योगदानाला आणि समाजहितासाठी केलेल्या उपक्रमांना सलाम म्हणून, लातूर मिशन वृत्तपत्राच्या वतीने दिला जाणारा शिवरत्न पत्रकारिता पुरस्कार यंदा समृध्द व्यापारचे संपादक दत्तात्रय गणपतराव परळकर यांना जाहीर झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून समृध्द व्यापार या वृत्तपत्राच्या माध्यमातून परळकर यांनी वाचकांपर्यंत सत्य, रचनात्मक आणि प्रेरणादायी माहिती पोहोचवण्याचे सातत्याने कार्य केले आहे. स्थानिक तसेच महाराष्ट्रातील व्यापारी वर्गाशी जपलेले विश्वासाचे नाते, वस्तुनिष्ठ वृत्तांकन आणि समाजोपयोगी उपक्रम यांच्या आधारेच हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती लातूर मिशनचे संपादक भारत जाधव यांनी दिली.शिवरत्न पुरस्कार सोहळा १९ ऑगस्ट २०२५ रोजी भव्य दिमाखात पार पडणार आहे. या वेळी पत्रकारिता, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कार जाहीर होताच समृध्द व्यापारच्या संपादक मंडळात आणि वाचकवर्गात आनंदाची लाट पसरली आहे. शुभेच्छुकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, हा सन्मान वाचकांच्या विश्वासाचे आणि पत्रकारितेतील सचोटिचे प्रतिक असल्याचे परळकर यांनी सांगितले.तसेच त्यांनी लातूर मिशनचे संपादक भारत जाधव व पुरस्कार निवड समितीचे मनःपूर्वक आभार मानले व या कार्यक्रमास सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे
