• Thu. Jul 31st, 2025

…तर मग साध्वीला जेलमध्ये टाकण्याची कोणाची हिंमत झाली?

Byjantaadmin

Jul 31, 2025

मालेगावमध्ये 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल 17 वर्षांनी आज (31 जुलै) आला. या प्रकरणात, एनआयएच्या विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासह सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्त केले. न्यायालयाने म्हटले आहे की संशयाच्या आधारे कोणालाही दोषी ठरवता येत नाही. या प्रकरणातील मुख्य आरोपी भोपाळच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर होत्या. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित सुद्धा आरोपींमध्ये होते. न्यायालयात निकाल वाचताना न्यायाधीशांनी सांगितले की तपासात अनेक चुका झाल्या आहेत. सरकारी बाजू बाईकमध्ये स्फोट झाल्याचे सिद्ध करू शकली नाही. न्यायाधीशांनी असेही म्हटले की पंचनामा योग्यरित्या करण्यात आला नाही.जलील म्हणाले, तत्कालिन पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांनी हे प्रकरण बाहेर काढलं होते. मालेगाव बाॅम्बस्फोटानंतर भगवा दहशतवाद समोर आला होता. दहशत निर्माण करण्यासाठी हे केलं गेलं होते. मात्र, आरोपी निर्दोष होत असतील, तर यामागे कोण होतं? अशी विचारणा त्यांनी केली. त्यांनी सांगितले की, तर मग साध्वीला जेलमध्ये टाकण्याची कोणाची हिंमत झाली? या प्रकरणात लष्करी अधिकाऱ्याला सुद्धा अडकवण्यात आलं होतं. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मग पुरावे खोटे होते, तर कोणी तयार केले?

जलील पुढे म्हणाले की, साध्वीची एकच ओळख मालेगाव स्फोटातील आरोपी इतकीच होती. त्या साध्वीला भोपाळमध्ये भाजपकडून उमेदवारी देण्यात आली, आमच्याकडे चांगले लोक नाहीत, हेच दाखवण्याचा प्रयत्न होता, असा टोला त्यांनी लगावला. त्यावेळी आर. आर. पाटील असताना या दहशतवादी केसेस झाल्या. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. आरोपींविरोधात पुरावे नाहीत, तर मग पुरावे खोटे होते, तर कोणी तयार केले? कृत्रिम पुरावे तयार करण्यात आले का? अशीह विचारणा त्यांनी केली.


बाईक प्रज्ञा यांच्या नावावर होती की नाही हे सिद्ध होऊ शकले नाही

दरम्यान, न्यायालय म्हणाले की, मालेगाव स्फोटात समोर आलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाईकचा चेसिस नंबर सापडला नाही. न्यायालयाने म्हटले आहे की ती बाईक साध्वी प्रज्ञा ठाकूर यांची होती की नाही हे स्पष्ट नाही. तपास यंत्रणांनी जे काही दावे केले आहेत, ते न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाहीत.
संपूर्ण प्रकरण काय?

खरं तर, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता, ज्यामध्ये 6 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या स्फोटात 100 हून अधिक लोक जखमीही झाले होते. लोक नमाज पठणासाठी जात असताना हा स्फोट झाला. बॉम्बस्फोटाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावच्या आझाद नगर पोलिस ठाण्यात अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
साध्वी प्रज्ञा आरोपींमध्ये

या प्रकरणाचा प्रारंभिक तपास पोलिसांनी केला होता, परंतु त्यानंतर संपूर्ण तपास एटीएसच्या हाती लागला. एलएमएल फ्रीडम बाईकमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचे तपासात उघड झाले. यामुळे स्फोट झाला, परंतु बाईकवरील नंबर चुकीचा होता. जेव्हा बाईकची चौकशी सुरू करण्यात आली तेव्हा असा दावा करण्यात आला की तो साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नावावर होता. या स्फोटानंतर सुमारे एक महिन्यानंतर, साध्वी प्रज्ञासिंहसह आणखी 2 जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणात एकूण 11 जणांना अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *