शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांचे आवाहन
सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची ११ वर्षे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न
निलंगा : केंद्र शासनाच्या योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आज याठिकाणी केंद्रिय संचार ब्यूरो यांनी आयोजित केलेल्या मल्टिमीडिया प्रदर्शनात युवक, महिला, शेतकरी, मध्यमवर्गसह पायाभूत सुविधांच्या माध्यमातून देशात होत असलेल्या विकास कामांची माहिती दिली आहे. बस स्थानकावर येणाऱ्या प्रत्येक प्रवासांनी या प्रदर्शनाला भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी निलंगा येथे आयोजित केलेल्या केंद्र शासनाच्या मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनच्या शुभारंभप्रसंगी केले. केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रिय संचार ब्यूरो आणि जिल्हा प्रशासन लातूर यांचे सयुंक्त विद्यमाने निलंगा शहरातील बस स्थानक येथे ११ वर्षे सेवा सुशासन गरीब कल्याण या विषयावर आयोजित दोन दिवसीय मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी श्री झाडके बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव, तहसिलदार प्रसाद कुलकर्णी, गट विकास अधिकारी एस ए अकेले, मुख्याधिकारी सुंदर बोंदर, तालुका कृषी अधिकारी एन आर शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप जाधव, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी राम आठवले, गट शिक्षण अधिकारी सतीश गायकवाड, नायब तहसिलदार कुलदीप देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. तहसिल प्रशासनाच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक लाभार्थ्यांच्या दारापर्यंत जाऊन शासकिय योजनांचा लाभ पोहोचवणार असल्याचेही श्री झाडके यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची प्रगती जलदगतीने होत आहे. राष्ट्र सर्वप्रथम: राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणामुळे संपूर्ण जगात प्रत्येक भारतीयांची मान उंचावत आहे. आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य, प्रधानमंत्री जन औषधी केंद्रामुळे सर्वसामान्य, वंचित आणि गरीब कुटुंबाना परवडण्याजोग्या दरात आरोग्य सेवा मिळत असल्याचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.गट विकास अधिकारी सोपान अकेले म्हणाले की, केंद्र शासनाच्या उज्वला गॅस योजना, मुद्रा योजना, स्टार्ट अप इंडिया, स्वच्छ भारत मिशन, बेटी बचाव बेटी पढाव सारख्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण होत आहे
अंबादास यादव यांनी प्रास्ताविकेत म्हणाले, केंद्र शासनाने मागील ११ वर्षात घेतलेले निर्णय, कल्याणकारी योजना, उपक्रम आणि विकास्तमक धोरणांची माहिती चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. यामध्ये पंतप्रधान घरकुल योजना, सुकन्या समृध्दी योजना, पी एम गतिशक्ती योजना, पंतप्रधान पीक विमा योजनांची माहिती दिली आहे. सदर प्रदर्शन हे आज आणि उद्या सायंकाळी ६ वाजे पर्यंत लोकांना बघण्यासाठी विनामूल्य खुले असणार आहे. कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात श्री शेख यांना ई रेशन कार्ड प्रमाणपत्र देण्यात आले. दत्तात्रय दापके यांनी मांडण्यात आलेल्या प्रदर्शनावर जिल्हा परिषद कन्या प्रशाला आणि महिला बचत गटासाठी मंजुषा स्पर्धा घेतली आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेतांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय दापके व आभार अतुल देशमुख यांनी केले. चित्रप्रदर्शनामध्ये तहसिल कार्यालय, आरोग्य विभाग, तालुका कृषी अधिकारी, नगरपरिषद, पंचायत समिती, बाल विकास प्रकल्प, उमेद, शिक्षण विभाग, जलसंधारण विभाग, पशुसंवर्धन विभाग, भारतीय स्टेट बँक, वित्तीय साक्षरता केंद्र आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांच्या मार्फत केंद्र व राज्य शासनाच्या राबविण्यात येत असलेल्या योजनांचे माहिती दालन ठेवण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी कार्यालय सहायक जे एम हन्नुरे , निलंगा बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक अनिल बिडवे, एम जी कोळी, साईराज राऊळ, योगी कोंडाबत्तीन आणि तहसिल कार्यालयाचे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला तालुक्यातील सरपंच, महिला बचत गट, विद्यार्थी, कोतवाल, पोलीस पाटील आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.