रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रलच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ थाटात
लातूर : रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रलचे २०२५ -२६ हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षात क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा तसेच रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर सेंट्रलच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभ नुकताच थाटात पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उमरगा – लोहारा मतदार संघाचे आमदार प्रवीण स्वामी यांची उपस्थिती होती. जयेश पटेल , रोटरीचे सहायक प्रांतपाल एड. बलवंत ( श्रीराम ) देशपांडे, क्लबचे मावळते अध्यक्ष डॉ. संजय वारद , मावळते सचिव विनोद पंडगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रलचे पंचवीसवे अध्यक्ष म्हणून श्रीधर ( बाळासाहेब ) खैरे, सचिव डॉ. नेताजी शिंगटे यांनी तर रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर सेंट्रलचे अध्यक्ष म्हणून रोहन मुंदडा , सचिव वेदांत बजाज यांनी पदभार स्वीकारला. दोन्ही क्लबचे सर्व संचालकही यावेळी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना आमदार प्रवीण स्वामी यांनी रोटरी ही समाजाला मदत करते व त्यातून मदत करण्याची भावना सर्वामध्ये निर्माण करते,असे सांगितले. ज्ञानेश्वर महाराज जसे विश्वाचे कल्याण व हीत पसायदानमध्ये पाहतात, तसेच रोटरी ही कोणताही जात – धर्म व देश न पाहता संपूर्ण जगासाठी काम करते. पोलिओ सारखा रोग जगातून समूळ नष्ट करण्यासाठी मोठे योगदान रोटरी परिवाराचे राहिले आहे असेही स्वामी यांनी सांगितले. रोटरीच्या कार्याचा त्यांनी गौरव केला.
रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रलला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आजपर्यंतच्या सर्व माजी अध्यक्ष व सचिवांचा यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. क्लबचे नूतन अध्यक्ष बाळासाहेब खैरे यांनी क्लबच्या वतीने आगामी काळात पर्यावरण, आरोग्य क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघराज बरबडे व रवींद्र चामले यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. नेताजी शिंगटे यांनी केले. याप्रसंगी संजय बोरा, डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे , गिरीष ब्याळे, विश्वनाथ पंचाक्षरी, हेमंत रामढवे, लक्ष्मीकांत गौड, सुर्दशन कांबळे यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते.
