लातूर जिल्हा बँकेने शेतकरी हित सर्वोच्च मानून वाटचाल केली, म्हणूनच लौकीक प्राप्त-जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांचे प्रतिपादन
लातूर ;- कधीकाळी अवसायनात निघालेली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्याचे माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनात सतत शेतकरी सभासदांच्या सेवेत कार्यरत असून शेतकरी हित सर्वोच्च स्थानी ठेवून विश्वस्ताची भुमिका स्विकारली म्हणूनच आज राज्य व देशभरात बँकेने नावलौकिक प्राप्त केला आहे. असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले. ते रविवारी लातूर जिल्हा आदर्श सहकारी बँक कर्मचारी संघटना, गट सचिव संघटना व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या वतीने सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल धिरज विलासराव देशमुख यांना मिळालेला पुरस्कार व जिल्हा बँकेस कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट बँक पुरस्कार मिळाला याबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी खासदार शिवाजी काळगे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव,रेणा साखर कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख,21 शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष घोडके, रेणापुर बाजार समिती सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती शेषराव हाके,गणपतराव बाजुळगे, संभाजी सुळ, प्रकाश सूर्यवंशी, संत शिरोमणीचे व्हाईस चेअरमन सचिन पाटील, जिल्हा बँकेचे संचालक एन आर पाटील, राजकुमार पाटील, पृथ्वीराज शिरसाठ, व्यंकट बिराजदार, अनुप शेळके, सौ स्वयंप्रभा पाटील, सौ सपना कीसवे, संचालक मारुती पांडे, कार्यकारी संचालक एच.जे. जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सहकार क्षेत्राच्या सक्षमतेसाठी केलेले जिल्हा बँकेचे कार्य इतरांना दिशादर्शकबँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांचे प्रतिपादन
पुढे बोलताना धिरज विलासराव देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राच्या सक्षमतेसाठी लातूर जिल्हा बँकेने केलेले कार्य इतरांसाठी दिशादर्शक आहे. जिल्हा बँकेच्या यशस्वी वाटचालीत अनेकांचे मोलाचे योगदान असून ते योगदान कधीही विसरता येणार नाही. भविष्यात देखील ही वाटचाल सांघिक कार्यातून यशस्वीपणे सुरू राहील असा विश्वास त्यांनी दिला.
जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीत जिल्हा बँकेचा वाटा-खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे मत
यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी जिल्हा बँकेच्या वाटचालीचा गौरव करत असताना जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीत लातूर जिल्हा बँकेने मोलाचे योगदान दिले असल्याचे सांगितले. धिरज देशमुख यांच्यासारखा तरुण अध्यक्ष बँकेस लाभला असल्याकारणाने निश्चितच त्यांच्या अध्यक्षतेखाली बँकेचे भविष्य देखील उज्वल आहे. असेही ते म्हणाले.
या प्रसंगी माजी आमदार वैजनाथ शिंदे यांनी बँकेस पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल अभिनंदन करून लोकनेते विलासराव देशमुख व सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या विचाराला डोळ्यासमोर ठेवून होत असलेल्या कार्याचे कौतुक केले. सर्व संचालक यांनी एकदिलाने, एका विचाराने नेतृत्वाला साथ दिल्यानेच लातूर जिल्ह्याच्या सहकाराचा गौरव होत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी बँक कर्मचारी संघटना अध्यक्ष गोविंद कोळपे, गट सचिव संघटना अध्यक्ष धोंडीराम पौळ, सेवानिवृत्त कर्मचारी पदमाकर मोगरगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बँकेचे विविध खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकारी गट्सचिव संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
