• Sun. Aug 3rd, 2025

मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारल्याने बायकोला जाळले, लातूरमधील प्रकार

Byjantaadmin

Jul 28, 2025

लातूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील पानगाव येथे मैत्रिणीला फिरायला का घेऊन गेला, अशी विचारणा करणाऱ्या बायकोच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न नवऱ्याने केला आहे. या भीषण घटनेत पीडित महिला 70 टक्के भाजली असून, तिला उपचारासाठी लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या जबाबावर रेणापूर पोलीस ठाण्यात पतिसह सासू, दीर आणि पतीच्या मैत्रिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने दिलेल्या जबाबानुसार, तिने आपल्या पतीला त्याच्या मैत्रिणीला फिरायला घेऊन जाण्याबद्दल जाब विचारला. यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. संतापलेल्या पतीने रागाच्या भरात महिलेच्या अंगावर थेट पेट्रोल ओतले. त्यानंतर, पतीच्या मैत्रिणीने लगेच काडी ओढून तिला पेटवून दिले.एवढ्यावरच न थांबता, सासूने घरातील दार बंद केले, तर दिराने बाहेरून दाराला कडी लावली, असे गंभीर आरोप पीडितेने आपल्या जबाबात नोंदवले आहेत. या क्रूर कृत्यात कुटुंबातील सदस्यही सामील असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.

महिला या हल्ल्यात गंभीर भाजली असून, तिचे शरीर सुमारे 70 टक्के भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तिला तातडीने लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.रेणापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पीडित महिलेच्या जबाबावरून पतीसह सासू, दीर आणि पतीच्या मैत्रिणीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *