भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत… हे जगण्यात आणा
सद्भावना मंच कार्यक्रम: डॉ. रफिक पारनेरकर यांचे प्रतिपादन
लातूर: व्यक्ती अथवा देशाचे यशस्वी होण्याचं रहस्य नैतिक आचरणात दडले आहे. त्यामुळे सर्वांनी भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहेत… ही प्रतिज्ञा आचरणात आणली तर सद्भावना वाढीस लागेल व देशातील सामाजिक ज्वलंत प्रश्न सुटतील असे मत संत साहित्य व इस्लामचे गाढे अभ्यासक डॉ. रफिक सय्यद पारनेरकर यांनी येथे व्यक्त केले. लातूर शहरातील बाभळगाव रोडवरील एकता संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित सद्भावना काळाची गरज या विषयावर ते बोलत होते. मंचावर जमाअते इस्लामी हिंदचे शहराध्यक्ष रफिक शेख, सचिव अहेमद हाश्मी, एकताचे संचालक राहुल बाजुळगे, राष्ट्रपती पदक विजेते सेवानिवृत्त सपोनि. अ.रहेमान सय्यद, बशीर शेख, जमातचे सदस्य जावेद खान उपस्थित होते.
संतांनी, प्रैषितांनी मानव कल्याणाचा संदेश दिला. हाच संदेश आम्हाला संविधानही देते. समता, एकात्मता , न्याय आणि बंधुता ही मुल्य सर्वांनी कृतीतून आचरणात आणावेत. अविवेकी आणि द्वेष पसरविण्याचा काही लोक जाणून बुजून प्रयत्न करतात मात्र यावरील औषध संत, प्रेषित आणि संवैधानिक विचार अमलात आणणे आहे. सर्वांचा ईश्वर एकच आहे. आम्ही सर्व बांधवच आहोत हे धर्मग्रंथासह आधुनिक विज्ञानाने ही सिद्ध केले आहे. निसर्गातील प्रत्येक सजीव, निर्जीव, जल, थल, हवा, पाणी, पाऊस सर्वच ही सद्भावना जपून आहे. फक्त माणूस याला अपवाद आहे. ईश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती मनुष्य मात्र भौतिकता आणि राजकारण्यांमुळे सद्भावनेपासून दूर जात आहे. त्यामुळे अनाचार, अत्याचार, भ्रष्टाचार वाढत आहे. प्रत्येक सुजाण भारतीयांनी सद्भावना जोपासण्याचे आवाहन विविध दाखले देत डॉ. रफिक पारनेरकर यांनी केले.यावेळी २५० हून अधिक विद्यार्थी, विद्यार्थीनी कार्यक्रमास उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. राहुल बाजूळगे यांनी केले, सुत्रसंचलन व आभार गौतम सर यांनी केले.
