राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या पतीला रेव्ह पार्टी प्रकरणी अटक केल्यानंतर त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ससून रुग्णालयात आधी जे काही घडलंय त्यावरुन या प्रकरणातील रिपोर्ट बदलण्याची शक्यता आहे अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच रोहिणी खडसे यांच्या मागे आपण आणि आपली पक्ष ठाम उभा असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “रोहिणी खडसे यांचा नवऱ्याचा विषय आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल. मला फक्त काळजी ससून रुग्णालयाची आहे. कारण मागच्या काळात जे काही घडलं आहे ते आपण पाहिलं आहे. रोहिणी खडसे सध्या पुण्याच्या दिशेने निघाल्या आहेत. आमचा पक्ष रोहिणी खडसे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.”
रोहिणी खडसे यांचा काय संबंध?
रोहिणी खडसे राजीनामा घ्या अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध? रोहिणी खडसेंचा नवरा आहे या प्रकरणात, त्यामुळे त्यांचा राजीनामा का घ्यायचा? एखादी महिला सक्षमपणे उभी राहत असेल तर या पुरुषांना काय त्रास होतोय. काल माधुरी मिसाळ यांच्या बाबत शिरसाट यांनी लिहिलेल पत्र पाहिलं. ती महिला सक्षम आहे. तिला अधिकार आहे बैठका घेण्याचा. मग तुमच्या पोटात का दुखतंय?
माणिकराव कोकाटे यांच्यामुळे महाराष्ट्राची बदनामी
माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होईल अशी चर्चा आहे. भाजप खासदारांनी मला भेटून सांगितलं. आता कोणतीही बातमी देशभर जाते. बातमी लगेच ट्रान्सलेट होते. कोकाटे यांच्या प्रकरणामुळे महाराष्ट्राची बदनामी होतं आहे. त्यांनी हात जोडून म्हणाले असते की माझी चूक झाली, तर सगळं संपलं असतं. परंतु त्यांनी तसं केल नाही. मला दिल्लीत खासदार विचारतात, नेमकं काय प्रकरण आहे. अशी बदनामी होणे योग्य नाही.”
रेव्ह पार्टीमध्ये खडसेंच्या जावयाला अटक
राज्यात एकीकडे हनी ट्रॅपवरून राज्यात वादंग सुरू आहेत, त्यात आता रेव्ह पार्टीवरून दुसरं वादळ निर्माण झालं. पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. या रेव्ह पार्टीवरील कारवाईत एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे.
उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या खराडीत एका फ्लॅटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीत 5 पुरूष आणि 2 महिलांचा समावेश होता. पार्टीत अंमली पदार्थ, दारू, हुक्का यांचं सेवन सुरू होतं. हाउस पार्टीच्या नावाखाली ही रेव्ह पार्टी सुरू होती.
या ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांचाही समावेश आहे. खराडी पोलीस ठाण्यात या सर्व 7 जणांवर गुन्हा दाखल झालाय. अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आलेत.puneपोलिसांकडून सातही जणांची चौकशी सुरू आहे.
