गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण अनेक घडामोडी सुरु आहे. मंत्रिमंडळातील अनेक नेते कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत आहेत. अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान अनेक मोठे आणि दिग्गज नेते फडणवीस यांच्या भेटीला पोहोचत आहेत. त्यासोबत गृहमंत्री अमित शाह यांच्याही भेटीला अनेक नेते मंडळी पोहोचत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात लवकरच मोठा भूकंप होणार अशी चर्चा रंगली आहे. त्यातच महायुतीतील 8 मंत्र्यांना लवकरच डच्चू देण्यात येणार असा दावा सामना या वृत्तपत्रातून करण्यात आला आहे.विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठं यश मिळालं खरं पण सरकार स्थापनेनंतर अनेक मंत्री आणि आमदार हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि वर्तनामुळे प्रकाशझोतात आले. या काही मंत्री आणि आमदारांमुळे सरकारची प्रतिमा गेल्या काही दिवसांमध्ये डागाळली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांच्या कार्यक्रमात काही मंत्र्यांची कामगिरीवर आपण समाधानी नसल्याचं म्हटलं. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होतील, असं राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
महायुती सरकारमधील ‘या’ 8 मंत्र्यांना मिळणार डच्चू?
सामनातून करण्यात आलेल्या दावानुसार मंत्री भरत गोगावले, शिक्षणमंत्री दादा भुसे, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट या शिंदे गटातील मंत्र्यांना नारळ मिळणार आहेत, असं म्हटलं जातंय. तर अजित पवार गटातील धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख प्रकरणात आधीच राजीनामा दिला आहे. त्यानंतर सातत्याने वादग्रत ठरलेले माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळही हिटलिस्टवर आहेत. भाजपकडून मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मत्स्यविकास मंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त वर्तन समोर आलं आहे. त्यामुळे त्यांचीही विकेट जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवारांना विधानसभाध्यक्ष करणार असल्याचं भाकितही सामन वृत्तापत्रातून करण्यात आलंय. तसंच राहुल नार्वेकरांना मंत्रिपद दिलं जाणार अशी चर्चा असल्याचंही बोलं जातंय.
रिमोट कंट्रोल अमित शाहांकडे
“मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचा आणि कोणाला काढायचे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. तरी रिमोट कंट्रोल अमित शहा यांच्याकडे आहे. मंत्रिमंडळात गोंधळाचे वातावरण सुरू आहे. मी काही दिवसापासून पाहत आहे. ,” असं म्हणत संजय राऊत म्हणालेत.
