मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. महायुती सरकारला स्थापन होऊन आता केवळ सात महिने होत आहेत पण या सात महिन्यांमध्ये अनेक नेत्यांवर विविध प्रकारचे आरोप झाले आहेत. या आरोपांचा फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला बसू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातील वादग्रस्त नेत्यांना घरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे. तसेच स्वच्छ आणि नव्या चेहऱ्यांना फडणवीस मंत्रिमंडळात संधी देणार असल्याची चर्चा आहे. अर्थात याबाबत अधिकृत अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत असल्याची चर्चा आहे. राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याची चर्चा असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले आहेत?
आमदार रोहित पवार यांनी आपल्या ‘एक्स’ अकाउंटवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राज्याच्या राजकारणाबाबत मोठा दावा केला आहे. “काही मंत्र्यांचे फोन बऱ्याचदा नॉट रिचेबल येत असून आपले फोन टॅप होत असल्याने मंत्री स्वतःहूनच फोन बंद ठेवततात, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरुय. बघुया या केवळ चर्चा आहेत की वास्तव हे येत्या काळात कळेलच..!”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
महायुतीत शीतयुद्ध?
MAHAYUTI शीतयुद्ध सुरु असल्याच्या चर्चा नेहमी सुरु असतात. हे सरकार स्थापन झालं तेव्हा देखील शीतयुद्ध बघायला मिळालं होतं. सुरुवातीला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडायला तयार नव्हते. तसेच त्यांनी काही महत्त्वाच्या खात्यांची देखील मागणी केली होती. पण त्यांच्या सर्व मागण्या मान्य होऊ शकल्या नाहीत. त्यांना मुख्यमंत्रीपदाचा दावादेखील सोडावा लागला होता. तसेच सत्ता स्थापन झाल्यापासून नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.शिवसेनेच्या मंत्र्यांनी अनेकदा अर्थमंत्री अजित पवार EKNATH SHINDE यांच्याकडे निधी वाटपाबाबत तक्रार केल्याची चर्चा असते. तर नुकतंच एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याकडून निधीवाटपात दुजाभाव केला जात असल्याची तक्रार भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची चर्चा आहे. त्यातूनच नगरविकास विभागाची कोणतीही फाईल आपल्या स्वाक्षरीशिवाय पुढे सरकरणार नाही, असा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्याची चर्चा आहे
