मनपा आयुक्त रमल्या शाळेत! आयुक्त श्रीमती मानसी यांची मनपा शाळेला भेट गुणवत्ता तपासणी करून शिक्षकांना सूचना
लातूर /प्रतिनिधी: मनपा आयुक्त श्रीमती मानसी तसेच मनपा शिक्षणाधिकारी श्रीमती श्वेता नागणे यांनी मंगळवारी (दि. २२) मनपा शाळेस भेट दिली. आयुक्त श्रीमती मानसी सुमारे अडीच तास विद्यार्थ्यांसमवेत रमल्या. त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची तपासणी केली.
मनपाच्या राजमाता जिजाऊ शाळा क्रमांक ११ येथे आयुक्तांनी मंगळवारी भेट दिली. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांची इंग्रजी व मराठी वाचन, लेखन, गणितीय क्रिया, पाढे, वाचन क्षमता पडताळणी केली. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून आयुक्तानी समाधान व्यक्त केले. काही विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते संदर्भात शिक्षकांना सूचनाही केल्या. शाळेची इमारत,वर्गातील रंगरंगोटी, शालेय पोषण आहार, डिजिटल साहित्य, गणवेश, पाठ्यपुस्तके वाटप, हजेरी, विद्यार्थ्यांची उपस्थिती व स्वच्छतागृहांचीही आयुक्तांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले.सुमारे अडीच तास आयुक्त श्रीमती मानसी शाळेमध्ये रमल्या. विद्यार्थ्यांशी एकरूप होऊन त्यांनी त्यांची मते जाणून घेतली. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. मंगळवारी इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी परिपाठ घेतला, त्यांनीच आयुक्त श्रीमती मानसी यांचे स्वागतही केले. आयुक्तांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत बराच काळ व्यतीत केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले.
