शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभागी व्हावे; 31 जुलैपर्यंत विमा हप्ता भरता येणार
लातूर, : नैसर्गिक आपत्तींपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविली जात आहे. लातूर जिल्ह्यात आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत ही योजना कार्यान्वित केली जात आहे. खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, तीळ आणि कापूस या पिकांसाठी शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 असून, शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सीएससी (CSC) केंद्रावर विमा अर्ज भरण्यासाठी प्रतिशेतकरी 40 रुपये शुल्क केंद्र सरकारने निश्चित केले आहे. केंद्र सरकारने निश्चित केलेले शुल्क संबंधित विमा कंपनीमार्फत सीएससी केंद्रांना दिले जाते. सर्व पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आणि ई-पिक पाहणी बंधनकारक आहे. शेतकरी सीएससी केंद्र, आपले सरकार सुविधा केंद्र किंवा https://pmfby.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज भरू शकतात. अधिक माहितीसाठी केंद्र सरकारच्या 14447 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा कृषी विभागाच्या https://www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे कृषी विभागाने आवाहन केले आहे.
एखाद्या अर्जदाराने फसवणूक करून या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला किमान पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले जाईल आणि त्याला सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच, ई-पिक पाहणी आणि विमा घेतलेल्या पिकात तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
