राज्य महामार्गात येणाऱ्या जमिनीचा मावेजा देऊनच काम चालू करावे अन्यथा तीव्र आंदोलन – शिवसेना
निलंगा -शेतजमीन, फळझाडे, घरे यांचा मावेजा देऊनच राज्य महामार्ग 238 च्या रस्त्याचे काम चालू करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी यांना इशारा दिला आहे.
अशीव ते निलंगा राज्य महामार्ग 238 चे काम चालू असून इस्टिमेटप्रमाणे 30 मीटरचा रस्ता असून रस्त्याचे काम चालू करण्यात आलेले आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतकऱ्यांच्या शेतजमिनी, घरे, फळझाडे असून या संदर्भात शासनाकडून अद्याप पर्यंत भूसंपादन करण्यात आलेले नाहीत किंवा सातबारावर तसा उल्लेखही करण्यात आलेला नाही व शेतकऱ्याला त्या संदर्भात नोटीसही दिल्या गेल्या नाहीत. रस्त्याचे क्षेत्र कमी करण्यात आलेले नाही. म्हणून या राज्य महामार्गात ज्या जमिनी घरे व फळझाडे जाणार आहेत त्याचा पंचनामा करून शासनाच्या नियमानुसार योग्य तो मावेजा शेतकऱ्यांना तात्काळ द्यावा अन्यथा शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना शेतकरीच सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिला आहे. सोबत जेवरी, सांगवी, शिंगणाळ ननंद येथील समस्त शेतकरी उपस्थित होते.
