शेतकऱ्यांसाठी परदेश अभ्यास दौऱ्याचे आयोजन; 23 जुलैपर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत
लातूर, दि. 16 (जिमाका): राज्यातील शेतकऱ्यांना प्रगत देशांतील विकसित आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, त्या देशांतील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून, क्षेत्रीय भेटी आणि संबंधित संस्थांना भेटी देऊन त्यांचे ज्ञान आणि कौशल्य वाढावे, यासाठी कृषी विभागामार्फत 2025-26 या वर्षात परदेश अभ्यास दौऱ्याची योजना राबविली जात आहे. यासाठी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 23 जुलै 2025 पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेसाठी जर्मनी, नेदरलँड्स, फ्रान्स, स्वित्झर्लंड, इस्रायल, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपिन्स, चीन आणि दक्षिण कोरिया या देशांची निवड करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यासाठी पाच शेतकऱ्यांचा भौतिक लक्षांक निश्चित करण्यात आला असून, यामध्ये एक महिला शेतकरी, एक केंद्र किंवा राज्य शासनामार्फत कृषी पुरस्कार प्राप्त किंवा पिकस्पर्धा विजेता आणि तीन अन्य शेतकऱ्यांचा समावेश आहे.
परदेश अभ्यास दौऱ्यासाठी शासनाकडून एकूण खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये यापैकी कमी रक्कम अनुदान म्हणून दिली जाईल. शेतकऱ्यांची निवड जिल्हास्तरीय समितीमार्फत केली जाईल. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी 23 जुलै 2025 पर्यंत आपले अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. व्ही. लाडके यांनी केले आहे.
