लातूरमध्ये अवैध सावकारीचा सुळसुळाट, गरीब जनतेचा छळ
चौकशी करून कारवाई करण्याची आमदार अमित देशमुख यांची विधानसभेत मागणी;
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून कार्यवाहीची ग्वाही

मुंबई (प्रतिनधी) : बुधवार १६ जुलै २५ :
लातूर शहराच्या पूर्व भागात वाढलेल्या अवैध सावकारकीचा बंदोबस्त करावा, भरमसाठ
व्याज वसूल करण्यासाठी गरीब गरजू जनतेचा छळ करून त्यांच्यावर अत्याचार केले जात
आहेत. या सर्व प्रकारणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून संबंधितावर कारवाई
करावी, अशी मागणी बुधवारी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
विधानसभेत केली.
पावसाळी अधिवेशनादरम्यान बुधवारी विधानसभेत बोलताना अवैध सावकारीचा मुद्दा
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उचलून धरला, ते म्हणाले की, अवैध
सावकारीची महाराष्ट्रात गंभीर समस्या निर्माण झालेली आहे, लातूरमध्येही हा प्रश्न गंभीर
आहे. वैध वित्तसंस्थांकडून कर्ज पुरवठा होत नसल्यामुळे लातूर शहराच्या पूर्व भागात अवैध
सावकारीचा सुसळाट निर्माण झाला आहे. दाम दुप्पट व्याज वसुलीसाठी अवैध सावकारांकडून
गरीब जनतेचा छळ होत आहे, प्रसंगी मुली, महिलावर अत्याचार करण्याच्या धमक्यात दिल्या
जात आहेत, यासंबंधीच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे यासंदर्भात सक्षम
अधिकाऱ्याकडून चौकशी करण्यात यावी, सावकारीच्या परवान्याची पडताळणी करून योग्य
निर्णय घेतले जावेत, गंभीर स्वरूपातील अत्याचाराच्या घटनेबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक
आणि पोलीस अधीक्षकाच्या पातळीवरून चौकशी आणि कारवाई करण्यात यावी, अशी मागणी
आमदार अमित देशमुख यांनी यावेळी विधानसभेत बोलताना केली.
यासंदर्भात आवश्यक ती चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल, अशी ग्वाही सहकार
मंत्री मा. बाबासाहेब पाटील यांनी यावेळी दिली.