सीमेवरच्या जवानांसाठी लातूरकरांचा “प्राणवायू” ; नरसिंह प्रतिष्ठानच्या ऑक्सिजन प्लॅन्टचे राष्ट्रार्पण
लातूर/प्रतिनिधी: कोविड महामारीच्या काळात लातूरकरांच्या सहकार्यातून,नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेला स्पंदन ऑक्सिजन प्लॅन्ट जम्मू काश्मीर मधील अखनूर येथे उभारण्यात येत असलेल्या 100 खाटांच्या मिलिटरी रुग्णालयास हस्तांतरित करण्यात आला. जिल्हाधिकारी सौ. वर्षा ठाकूर घुगे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यामुळे सीमेवरील जवानांना आता लातूरकरांचा ” प्राणवायू”च जणू मिळणार आहे.
लातूरकरांच्या दातृत्वातून 1 कोटी 5 लाख रुपये खर्च करून या प्लॅन्टटची उभारणी करण्यात आली होती. यासाठी पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे काका, लक्ष्मीरमण लाहोटी,ज्येष्ठ विधीज्ञ संजय पांडे,डॉ. अशोक आरदवाड,अतुल ठोंबरे,डॉ. अजय पुनपाळे,डॉ. कल्याण बरमदे, विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्टान,बांधकाम व्यावसायिक, वकील,व्यापारी,पत्रकार बांधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहकार्य केले होते.प्रशासकीय पातळीवर तत्कालीन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.जी. श्रीकांत,,मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी ही मदत केली. कोविडची लाट ओसरल्यानंतर या प्लॅन्टची स्थानिक पातळीवर फारशी गरज नव्हती. त्यामुळे प्लॅन्ट राष्ट्राला अर्पण करण्यात आला. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी हा प्लॅन्ट महत्त्वाचा ठरणार आहे. यासाठी लष्करा कडून ब्रिगेडीयर कमांडर (10 डिव्हिजन आर्टिलरी ब्रिगेड) विनय शर्मा यांनी गेली 2 महिने संपर्क साधून पत्र व्यवहार केला होता.
सोमवारी (दि. 14)जिल्हाधिकारी सौ. वर्षा ठाकूर घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत याचे राष्ट्रार्पण संपन्न झाले. यावेळी लष्कराचे प्रतिनिधी सोमनाथ लाटकर, नरसिंह प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष कुलकर्णी, सचिव संजय अयाचित, डॉ. विश्वास कुलकर्णी, डॉ. श्रीकांत हिरेमठ, सौ. गीता ठोंबरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. जिल्हाधिकाऱ्यानी हिरवा झेंडा दाखवून हा ऑक्सिजन प्लॅन्ट राष्ट्राला समर्पित केला.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सौ. वर्षा ठाकूर म्हणाल्या की, लातूरमध्ये कर्तृत्व आणि दातृत्वाची कमी नाही. नवी सामाजिक विचारधारा लातूरमध्ये रुजलेली असून ती अनुकरणीय आहे. यामुळे देशभरात लातूरकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आहे. याची देशात चर्चा होत असते. आता लातूरकरांचा ऑक्सिजन प्लॅन्ट सीमेवरील जवानांसाठी रवाना होत असून हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे त्या म्हणाल्या.
लष्कराचे प्रतिनिधी म्हणून आलेले सोमनाथ लाटकर यांनी लातूरकरांच्या माणुसकीला सलाम केला. प्रास्ताविकात डॉ.विश्वास कुलकर्णी यांनी आपली लेक चांगल्या घरात जाण्याचा जो आनंद पित्याला होतो तशीच भावना यावेळी मनात असल्याचे सांगितले. प्रारंभी जिल्हाधिकारी सौ.वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते ऑक्सिजन प्लॅन्ट घेऊन जाणाऱ्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. डॉ.विश्वास कुलकर्णी,शिरीष कुलकर्णी,सौ. नीता कानडे, संजय अयाचित यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.संजय अयाचित यांच्या हस्ते सोमनाथ लाटकर यांना स्पंदन प्रकल्प सुपूर्द करण्यात येत असल्याचे पत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नंदू कुलकर्णी व डॉ. वैशाली टेकाळे यांनी केले. डॉ. टेकाळे यांनीच उपस्थित मंडळींचे आभार मानले.
यावेळी डॉ. अजय जाधव, अभियंता रवी ढोले यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
