मनपा आयुक्तांकडून शहरातील वाहतूक व्यवस्थेची पाहणी ; कोंडी दूर करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना
लातूर/ प्रतिनिधी: लातूर शहर मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी शहरातील प्रमुख चौकातील वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली. चौकामध्ये होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.आयुक्त श्रीमती मानसी यांनी गंजगोलाई,फ्रुट मार्केट, अण्णाभाऊ साठे चौक, बसवेश्वर चौक,कन्हेरी चौक, छत्रपती चौक, बाह्य वळण रस्ता,पाच नंबर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीन रेणापूर नाका व जुना रेणापूर नाका या शहरातील प्रमुख चौकात स्वतः थांबून वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला.
शहरात होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी काही रस्ते वन-वे करण्याबाबत पाहणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. गंजगोलाई परिसरात वाहने पार्किंग करण्यासाठी जागेची आयुक्तांनी पाहणी केली. गंजगोलाईत ऑटो थांबे निश्चित करण्यासाठी जागा पाहिली. अण्णाभाऊ साठे चौक येथील पार्किंगची जागा तसेच बसवेश्वर चौकातील वाहतूक कोंडीचीही त्यांनी पाहणी केली. शहरातील कन्हेरी चौक व वाडा हॉटेल येथे सिग्नल चालू करण्या संदर्भात आयुक्तांनी पाहणी केली. शहरा बाहेरून जाणारा बाह्य वळण रस्ता व सर्विस रोडवर होणाऱ्या अनाधिकृत पार्किंग बाबत ट्रान्सपोर्ट असोसिएशन, वाहन दुरुस्ती चालक व ऑटोमोबाईल चालकांची बैठक घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. पाच नंबर चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काय करता येईल? याची आयुक्तांनी पाहणी केली.
नवीन रेणापूर नाका परिसरात रस्त्यावर पाणी थांबत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. त्या पाण्याचा निचरा करण्याचा सूचना करतानाच रेल्वे स्थानकाकडे जाणारी डावी बाजू मोकळी करावी, असेही आयुक्तांनी सूचित केले. जुना रेणापूर नाका येथील बस स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाची पाहणी करून तेथील वाहतूक कोंडी दूर कशी करता येईल? या संदर्भात चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तेथे काय उपाययोजना करता येतील ? यासंदर्भात आयुक्तांनी माहिती घेतली. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पार्किंगच्या जागा कराव्यात. रस्त्यावर पट्टे मारावेत. पार्किंगच्या जागेसंदर्भात फलक लावावेत तसेच अडथळा ठरणारे विजेचे खांब हलवावेत, अशा सूचनाही आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केल्या.यावेळी वाहतूक नियंत्रण शाखा व मनपा अतिक्रमण विभागाचे अधिकारी सोबत होते.
