गौर येथे 360 वृक्षांचा वाढदिवस उत्साहात साजरा…
पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण काळाची गरज-तहसीलदार कुलकर्णी
निलंगा प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील गौर येथील विठ्ठलराव पाटील मेमोरियल हायस्कूलच्या मैदानावर संगोपन करण्यात आलेल्या तब्बल 360 वृक्षांचा प्रथम वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक केशव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, गटशिक्षणाधिकारी सुरेश गायकवाड, केंद्र प्रमुख विजयकुमार धुमाळ, वृक्ष प्रतिष्ठान लातूरचे अनिल वारद, जगताप मॅडम, सावंत मॅडम, बिराजदार मॅडम,गौर सरपंच प्रतिनिधी तथा ग्रा.प. सदस्य विठ्ठल टोकले, आनंदवाडीचे सरपंच प्रतिनिधी विष्णू चामे, समाजसेवक ज्ञानोबा चामे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, तंटामुक्त उपाध्यक्ष सिध्देश्वर तावडे, मुख्याध्यापक किसन दैतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.8 जुलै रोजी मंगळवारी वृक्षाच्या वाढदिवसानिमित्ताने गावातून वृक्ष दिंडी काढण्यात आली झाडे लावून, झाडे जगवा पर्यावरणाचा समतोल राखा असा संदेश वृक्षदिंडीतून देत विद्यार्थ्यांनी लोकजागृती केली.
वृक्षदिंडीच्या समारोपानंतर शाळेच्या प्रांगणात लावण्यात आलेल्या वृक्षांच्या भोवती विद्यार्थिनींनी सुबक अशी रांगोळी काढली होती मान्यवरांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून केक कापून या सर्व पक्षांचा मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.
वृक्षाच्या प्रथम वाढदिवसानिमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना निलंग्याचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी म्हणाले की, क्षेत्रफळाच्या केवळ दीड टकाच वृक्ष आहेत पर्यावरण संतुलन राखण्यासाठी 33% वृक्ष असणे गरजेचे आहे पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण अधिक प्रमाणात करणे गरजेचे असून वृक्षारोपणाबरोबर केलेल्या वृक्षांचे संगोपन ही तितकेच महत्वाचे आहे वृक्षारोपण जर वाढले तर पर्यावरणाचा नक्कीच समतोल राखला जाईल पर्यावरणासह आपणास ऑक्सिजन ही मोठ्या प्रमाणात मिळेल या झाडांपासून ताजी रुचकर फळेही आपणास मिळणार आहेत म्हणून मोठ्या प्रमाणात आपल्या सभोवताली वृक्षाची लागवड करावी असे आव्हान करत वृक्ष लागवड करुन उत्कृष्ट जोपासणी केल्याने शाळेतील मुला-मुलींचे कौतुक केले. व वृक्ष संवर्धन व वृक्षारोपणासाठी तहसीलमार्फत काही मदत लागली तर केव्हाही उपलब्ध करून देण्याचे यावेळी आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत पाटील यांनी केले तर आभार लामतुरे यांनी मांनले.
360 वृक्षाचे केले संगोपन…
गेल्या वर्षी वृक्ष प्रतिष्ठान लातूर,एच. डी. एफ. सी. बँक, ग्रामपंचायत गौर व आनंदवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विट्ठलराव पाटील मेमोरियल हायस्कूलच्या प्रांगणात महागड्या मोहगनीसह इतर 400 वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षाचे विध्यार्थी, शिक्षक, सेवकांनी उत्कृष्टरित्या संगोपन करत 360 वृक्ष जगवली आहेत. यामुळे शाळेच्या दर्शनी भागात वृक्ष बहरात आल्याने शाळेच्या प्रांगणात निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे.
वृक्ष पालखीचे विशेष आकर्षण…
शाळेतील शिक्षिका व विद्यार्थ्यांनी विशेष अशी वृक्ष पालखी तयार केली होती. वृक्षदिंडीतून पालखीचे गावभरातून मिरवणूक काढण्यात आली या वृक्षपालखीचे विशेष आकर्षक ठरले.तसेच विठ्ठल-रुक्मिणी व . इतर वेशभूषा विद्यार्थ्यांनी परिधान केल्याने वृक्षदिंडीकडे गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
