ऐन प्रचारात स्टेजवरच पतीचे निधन; लातूरच्या मुरुडमध्ये सहानुभूतीच्या लाटेत पत्नीच्या पॅनलचा दणदणीत विजय
लातूर : जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मुरुड ग्राम पंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पत्नीच्या निवडणूक प्रचारात भाषण करून स्टेजवर बसले असताना छातीत कळ आली आणि पत्नी अमृता नाडे यांच्या खांद्यावर अखेरची मान टाकली. त्यानंतर गावात निवडणुकीचा प्रचारच बंद झाला. विरोधी पक्षांनीही अमृता नाडे यांना सरपंचपदासाठी उघड पाठिंबा दिला. मात्र ग्रामस्थांनी अमृता नाडे यांच्यासह त्यांच्या पॅनललाही पूर्ण पाठिंबा दिला अन् ३५ वर्षे सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित दिलीप नाडे पाटील यांना धक्का बसला. दिलीपदादा नाडे पाटील पॅनलचा केवळ एक उमेदवार निवडून आला आहे. तर अमृता नाडे पाटील यांच्या पॅनलचे १६ उमेदवार निवडून आले आहेत.
मुरुड ही लातूर – उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असणारी लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या त १७ ग्रामपंचायत सदस्य आणि एक सरपंच असे १८ उमेदवार आहेत. मुरुडमधे गत ३५ वर्षांपासून दिलीप नाडे यांची एकहाती सत्ता होती. मात्र यंदा निवडणुकीच्या रिंगणात तीन पॅनल उतरले होते. त्यापैकी दिलीप नाडे यांचा पुतण्या अमर नाडे यांनी काकाच्या विरोधातच शड्डू ठोकला होता. परिवर्तन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आणि पत्नी अमृता नाडे यांना सरपंचपदासाठी उभे केले. दरम्यान त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली. प्रचारादम्यान एका सभेत त्यांनी भाषण केलं आणि स्टेजवर बसले. त्यानंतर अवघ्या पाचचं मिनिटांनी त्यांच्या छातीत कळ आली आणि त्यांनी पत्नी अमृता नाडे यांच्या खांद्यावर अखेरची मान टाकली. त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे अमृता नाडे यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मुरुड गावातही सर्वत्र शोककळा पसरली.
अमर नाडे यांच्या निधनाने अमृता नाडे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट निर्माण झाली. खुद्द दिलीप नाडे यांनीही अमृता नाडे यांना सरपंचपदासाठी आपला पाठिंबा जाहीर केला. दिलीप नाडे यांनी निवडणूक लढविली ती त्यांच्या पक्षाच्या इतर उमेदवारांसाठी. मात्र मुरुड ग्रामस्थांनी केवळ अमृता नाडेच नव्हे तर त्यांच्या नेतृत्वातील अख्ख्या पॅनलला निवडून देण्याचा निश्चय केला. आज हाती आलेल्या निकालानुसार अमृता नाडे यांच्यासह त्यांच्या पॅनलचे १७ उमेदवार विजयी झाले. तर दिलीप नाडे यांच्या पॅनलमधील केवळ एक महिला उमेदवार निवडून आली आहे. अमृता नाडे आणि त्यांचे पॅनल बहुमताने विजयी झाले आहेत. अमृता नाडे यांनी विजय आणि दिलीप नाडे यांनी पराजय शांतपणे स्वीकारला आहे.
आता पतीच्या निधनानंतर केवळ कुटुंबाचीच नव्हे तर संपूर्ण गावाची जबाबदारी अमृता नाडे यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. येत्या काळात त्या खंबीर राजकीय नेतृत्व म्हणून उदयास येतील, असा विश्वास मुरुड येथील नागरिकांना वाटतो.