शेतीच्या मशागतीसाठी पैसे आणि बैल नसल्याने स्वत: औताला जुंपून घेण्याची वेळ आलेल्या लातूरमधील वृद्ध शेतकऱ्याचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अंबादास गोविंद पवार (वय 75) यांनी स्वत:ला औताला जुंपले होते आणि त्यांची पत्नी त्यांना मदत करत होती, हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी अंबादास पवार यांना प्रत्यक्ष मदत केली होती. तर काहींनी त्यांना नांगरणीसाठी बैल घेऊन देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, भाजप नेते गणेश हाके यांनी मदतीच्या नावाखाली या वृद्ध शेतकऱ्याची थट्टा केल्याचा प्रकार घडला आहे. गणेश हाके हे अहमदपूर तालुक्यातील हाडोळती या गावात अंबादास पवार यांनी भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी गणेश हाके यांनी स्वत: औत ओढून पाहिला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांच्या आजुबाजूला असलेल्या लोकांनी आपले नेते औत ओढत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. यानंतर गणेश हाके यांच्यावर प्रचंड टीकेची झोड उडली. भाजपचे गणेश हाके हे अंबादास पवार यांना मदत करायला गेले होते की स्टंटबाजी करायला, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

गणेश हाके यांच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत ते औत ओढताना दिसत आहेत. यामध्ये ते शेतकऱ्याचे जीवन कसे अवघड असते, माझ्यासारख्या धडधाकट माणसालाही औत ओढायला कष्ट करावे लागत आहेत, असे सांगताना दिसत आहेत. या सगळ्यातून गणेश हाके यांनी संबंधित शेतकऱ्याची मदत सोडा पण स्वत:ची स्टंटबाजीची हौस भागवून घेतली. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर भाजपचे गणेश हाके हे टीकेच धनी ठरताना दिसत आहेत. या व्हिडीओवरुन टीकेची झोड उठल्यानंतर गणेश हाके यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, अहमदपूर तालुक्यातील अंबादास पवार आणि त्यांची पत्नी मुक्ताबाई हे हे गेली १० वर्षे बैलाविना नांगर ओढतात. त्यांची पत्नी कोळपणीचे काम करते. हा 75 वर्षांचा शेतकरी कष्ट करतो. त्याच्या वेदना जाणून घेण्यासाठी, वेदनेचा हुंकार होण्यासाठी, एक जाणीव म्हणून मी औत ओढले होते. जेणेकरुन शेतकऱ्यांना किती त्रास होतो, हे मला जाणून घ्यायचे होते. तो औत ओढून पाहिल्यानंतर मला कळालं की, हा शेतकरी कुठल्या दुर्दम्य इच्छाशक्तीने शेती करतोय. प्रतिकूल परिस्थिती असताना शेती करतोय. त्याला किती कष्ट करावे लागतात, हे औत ओढून पाहिल्यानंतर मला कळाले. मला प्रसिद्धीचा सोस नव्हता. मी तिकडे गेलो तेव्हा तेथील प्रसारमाध्यमांनी माझा व्हिडीओ शूट केला. तो व्हिडीओ मी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेला नाही, असे गणेश हाके यांनी सांगितले.