मुंबई: विधानसभा निवडणुकीत मतदारांच्या याद्यांमध्ये झालेल्या कथित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती मतदार याद्यांशी संबंधित गैरप्रकार कसे रोखता येतील, याबाबत उपाय सुचवणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली.
भाजपने निवडणूक आयोगाला हाताशी धरून गैरमार्गाने सत्ता मिळवली, असा आरोप काँग्रेसने केला आहे. यापुढे असे प्रकार घडू नयेत, यासाठी समिती उपाय शोधणार आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील समितीत एकूण 7 सदस्य आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडदे पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, विधानसभेचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी, परिक्षित विरेंद्र जगताप यांचा समावेश आहे. अभय छाजेड हे समन्वयक म्हणून काम पाहतील.”काँग्रेसने यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे मतदार याद्यांमधील गैरप्रकाराबाबत तक्रार दाखल केली आहे. मात्र, आयोगाने अद्याप समाधानकारक उत्तर दिलेले नाही. भाजप निवडणुका जिंकण्यासाठी गैरमार्गाचा वापर करत असून मतदार याद्यांमध्ये मोठया प्रामणात घोटाळे केले जात आहेत,” असे काँग्रेसचे म्हणणे आहे. ही समिती या प्रकरणाचा अभ्यास करून आपला अहवाल प्रदेश काँग्रेसला सादर करेल.दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही वारंवार केला आहे. याबाबत त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सविस्तर भाष्यही केले होते. मात्र निवडणूक आयोगाकडून हे सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले होते. आता काँग्रेसकडून राज्य पातळीवर नेमलेल्या समितीचा पक्षाला आगामी निवडणुकांत काही फायदा होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे
