• Thu. Jul 10th, 2025

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे-सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

Byjantaadmin

Jul 6, 2025

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे-सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

लातूर, : अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील वृद्ध शेतकरी अंबादास पवार हे त्यांच्या शेतात स्वत: नांगर ओढतानाचे छायाचित्र व्हायरल झाले होते. यानंतर राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तातडीने या शेतकऱ्याशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेत, त्यांचे पीककर्ज फेडण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार सहकार मंत्र्यांनी आज हाडोळती येथे या श्री. पवार यांच्या घरी भेट देवून त्यांच्यावर असलेले सर्व कर्ज भरले. तसेच शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी आमदार विक्रम काळे, अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, अहमदपूरच्या तहसीलदार उज्वला पांगरकर, तालुका कृषी अधिकारी सचिन बागवे, सहाय्यक निबंधक श्री.  पालवे, गटविकास अधिकारी पंकज शेळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील आदी उपस्थित होते.

शेतकरी अंबादास पवार यांच्याकडे थकीत असलेले हाडोळती विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे थकीत कर्ज व त्यावरील व्याजाची परतफेड करण्यासाठी सहकार मंत्री श्री. पाटील यांनी सोसायटीच्या पदाधिकारी, अधिकारी यांच्याकडे सुमारे 42500 रुपये सुपूर्द केले. तसेच या रक्कमेचा भरणा करून त्याबाबतचे प्रमाणपत्र श्री. पवार यांना सुपूर्द करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी शासन सकारात्मक असून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत, असे सहकार मंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *