• Thu. Jul 10th, 2025

गुऱ्हाळ जिल्हा परिषदेच्या “त्या ” शिक्षकाला बडतर्फ करा..! गट शिक्षण अधिकाऱ्यांची  खातेनिहाय चौकशी करा..! छावा संघटनेची  जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार.. 

Byjantaadmin

Jul 6, 2025

गुऱ्हाळ जिल्हा परिषदेच्या “त्या ” शिक्षकाला बडतर्फ करा..! गट शिक्षण अधिकाऱ्यांची  खातेनिहाय चौकशी करा..! छावा संघटनेची  जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार.. 

निलंगा (प्रतिनिधी)

मौजे गुऱ्हाळ तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षक सपकाळे पांडुरंग तुकाराम यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करण्यात यावे  व येथील वादग्रस्त शिक्षकाला पाठीशी घालणाऱ्या निलंगा येथील गट शिक्षण अधिकारी सुरेश गायकवाड यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावरही कायदेशीर  कारवाई करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा  छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष तुळसीदास साळुंके यांनी जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे निवेदनाद्वारे   केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,मागील सहा वर्षापासून गुऱ्हाळ जिल्हा परिषद शाळेत  कार्यरत असलेले सहशिक्षक  सपकाळे पांडुरंग तुकाराम हे वादग्रस्त  शिक्षक  शाळेत बेशिस्त वर्तन करीत असून,शालेय शिस्तीचा भंग करणे,शाळेत वेळेवर हजर राहत नाहीत,सहकारी शिक्षकांच्या अंगावर मारहाण करण्याच्या उद्देशाने धावून जाणे, शालेय साहित्याची नासधूस करणे,प्रसंगी शाळेतील  साहित्य विनापरवानगी  घरी घेऊन जाणे,कार्यालयीन दस्तऐवज खराब करणे,गावातील राजकारणात सहभागी होणे,पालक वर्गामध्ये शाळेबद्दल अविश्वास निर्माण करणे,चुकीची  व खोटी माहिती देऊन पालकांना त्यांच्या पाल्याच्या स्थलांतर दाखले घेऊन जाण्यास प्रवृत्त करणे, कामचुकार व षडयंत्री लोकांशी संगनमत करून शाळेबद्दल खोट्या अफवा पसरविणे,या शाळेत काय आहे. असे बेजबाबदार विधाने करून विद्यार्थी व पालकांत गैरसमज करणे,दैनदिन अध्यापन वेळापत्रकाप्रमाणे  न करता सहकारी शिक्षकाकडे सोपवून शाळेच्या प्रांगणात खुर्ची घालून मोबाईल पाहत बसणे याबाबत मुख्याध्यापकांनी जाब विचारला असता त्यांच्याशी तासनतास वितंडवाद घालेने यासह अनेक विविध प्रकारचे गैरकृत्य करणाऱ्या या बेशिस्त शिक्षकाला तत्काळ बडतर्फ करण्यात यावे व अश्या कामचुकार शिक्षकांना पाठीशी घालणाऱ्या  गट शिक्षण अधिकारी सुरेश गायकवाड यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्या विरोधातही कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी  मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.

या वादग्रस्त शिक्षकांबद्दल अनेकवेळा गट शिक्षण अधिकारी  निलंगा यांच्याकडे लेखी स्वरूपात  तक्रारी देऊनही अद्याप पर्यंत गट शिक्षण अधिकाऱ्यांनी  ठोस स्वरूपाची  कारवाई न करता या शिक्षकाला पाठीशी घातले आहे. अश्या कर्तव्यात दिरंगाई करणाऱ्या गट शिक्षण अधिकारी सुरेश गायकवाड यांची  खाते निहाय चौकशी करून कारवाई करण्यात यावी  व गोरगरिबांची पोरं शिक्षण घेत असलेली जिल्हा परिषद शाळा बंद पाडण्यासाठी चंग बांधलेल्या  दोषी सपकाळे पांडुरंग तुकाराम या  शिक्षकाला सेवेतून तत्काळ बडतर्फ करण्यात यावे.अन्यथा याविषयी संघटनेच्या व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक पक्ष  संघटनेच्या कार्यकर्त्यासह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल  असा इशाराही छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या  निवेदनात देण्यात आला आहे.निवेदनावर तालुका अध्यक्ष दास साळुंके यांच्या सह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *