मंडळ अधिकारी संजय निटूरकर यांचा सेवागौरव सोहळा साजरा ;शासकीय वाहनाने कुटूंबियांसह घरापर्यंत सोडले
निलंगा- निलंगा तालुक्यातील मंडळ अधिकारी संजय निटूरकर हे सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने निलंगा तहसील कार्यालयात त्यांचा कुटूंबातील सदस्यांसह सत्कार करुन सेवा गौरव सोहळा साजरा करण्यात आला. शासकीय वाहनातून त्यांना आणि कुटुंबातील सदस्यांना घरापर्यंत सोडण्यात आले.
निलंगा तालुक्यातील निटुर येथील संजय निटूरकर हे १९९२ मध्ये तलाठी पदावर सेवेत रुजू झाले होते. तब्बल ३२ वर्षांची प्रदीर्घ शासकीय सेवा करुन ते मंडळ अधिकारी या पदावरून निवृत्त झाले. शिस्त, संयम, सौम्य स्वभाव आणि गाठलेली प्रशासकीय शिखरं यांनी भरलेला त्यांचा एक आदर्श मार्ग होता.
ते नेहमी अतिशय शांतपणे, संयमाने, पण प्रशासनावर ठाम पकड ठेवून काम करणारे अधिकारी म्हणून ओळखले गेले. कोणालाही प्रशासकीय पातळीवर आलेली अडचण ते सहजपणे सोडवून देत होते. निलंगा तहसील कार्यालयात त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सेवा गौरव सोहळा पार पडला. यावेळी निलंगा उपविभागीय अधिकारी झाडके, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, अप्पर तहसीलदार कासारसिरशी शिवाजी कदम , यांच्यासह तलाठी संघटना आणि महसूल कर्मचारी संघटनेचे मान्यवर यावेळी उपस्थित होते.
