त्या शेतकरी दाम्पत्याला मदत करण्याचा सहकारमंत्र्यांचा फोन
लातूर: हाडोळती, ता. अहमदपूर येथील अंबादास पवार व मुक्ताबाई पवार हे दाम्पत्य बैलाऐवजी स्वतःला जुंपून मशागत करत असल्याचे दृश्य माध्यमांमधून प्रसिद्ध होताच राज्याच्या सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी त्या शेतकऱ्यास मदतीची घोषणा केली. सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी थेट अंबादास पवार व मुक्ताबाई पवार या वृद्ध शेतकरी दाम्पत्यास थेट फोन करून त्यांच्यावर असलेले कर्ज फेडण्याचे व बी-बियाणांसाठी पैसे देण्याची हमी दिली.
गेली दोन दिवसांपासून अंबादास पवार व मुक्ताबाई पवार हे आपल्या शेतात बैलाऐवजी स्वतःला जुंपून घेवून मशागत करत असल्याचे दृश्य माध्यमांमधून प्रचंड व्हायरल झाले. तसेच राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी आज थेट त्या शेतकऱ्याला फोन करून त्याच्याकडे असलेल्या कर्जाची माहिती घेतली व ते ४० हजार रूपयांचे कर्ज भरण्याचे आणि त्यांना लागणाऱ्या बी-बियाणे यासाठी मदत करण्याची हमी दिली.अंबादास पवार व मुक्ताबाई पवार या वृद्ध दाम्पत्याकडे एकूण ५ एकर जमीन आहे. ती पूर्णपणे कोरडी आहे. गेली दहा वर्षांपासून ते बैलाऐवजी स्वतःला जुंपून घेत शेती करतात, असे त्यांनी सांगितले. आता वृद्धावस्थेत शेती करणे अवघड झाले आहे. मुलगा पुण्याला कोठेतरी खाजगी नोकरी करतो, असे त्यांनी सांगितले व बैल बारदाणा करणे किंवा शेती करणे

परवडत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्याशी बोलत असताना अंबादास पवार यांनी आमच्यावर असलेले कर्ज भरा व बी-बियाणे यासाठी मदत करा. तसेच आमच्या मुलांना नोकरीसाठीही प्रयत्न करा, अशी विनंती केली.सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या भूमिकेमुळे राज्यात त्यांचे कौतुक होत आहे.