मनपातील जन्ममृत्यू विभागाचा आयुक्तांनी घेतला आढावा
लातूर/ प्रतिनिधी: लातूर शहर महानगरपालिकेतील जन्म- मृत्यू विभागाचा आढावा घेऊन आयुक्त श्रीमती मानसी यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध सूचना केल्या. नागरिकांना अधिक तत्परतेने सेवा देण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पालिकेतील जन्म-मृत्यू विभागात मोठी गर्दी असते. सध्या शाळा प्रवेशाचे दिवस असल्याने अनेक नागरिक जन्म दाखले घेण्यासाठी येतात, त्यामुळे गर्दी होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आयुक्तांनी जन्म- मृत्यू विभागात भेट देऊन पाहणी केली. यावेळी नागरिकांना चांगली सेवा देता यावी तसेच गर्दीचे नियोजन करता यावे यासाठी टोकन सेवा सुरू करावी असे त्यांनी सांगितले.दाखला मागण्यासाठी आलेल्या व्यक्तीला टोकन देऊन निश्चित वेळ ठरवून द्यावी. त्या वेळेत त्याला प्रमाणपत्र दिले जावे. प्रमाणपत्राचे शुल्क भरण्यासाठी क्यू आर कोड, स्कॅनर अशा उपायोजना राबवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. विभागाकडे उपलब्ध असणाऱ्या मनुष्यबळासाठी अतिरिक्त संगणकांची सोय करावी. प्रमाणपत्रांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र काउंटर सुरू करावे. प्रमाणपत्रातील दुरुस्तीसाठी आवश्यक तेवढीच कागदपत्रे घ्यावीत. नागरिकांना विनाकारण त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी. नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यासाठी ऑनलाईन पद्धत सुरू करता येईल का? तसेच नागरिकांना घरबसल्या प्रमाणपत्र मिळावे यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबाबत चाचपणी करावी आणि शक्य असेल तर अशी सेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. एकाच काउंटरवर गर्दी होऊ नये यासाठी उपाय योजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांचीही यावेळी आयुक्तांसमवेत उपस्थिती होती.
