लातूर: पटवेकर, अत्तार, तांबोळी, मणियार फाउंडेशनच्या वतीने लातूर जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील इयत्ता दहावी शालांत परीक्षेमध्ये 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या आणि नीट परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सोहळ्यात दोन सत्रांमध्ये 100 हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मौलाना शौकत यांच्या कुराण पठणाने झाली. यानंतर खानसा कुमठे, जैद मुस्तफा मणियार या गुणवंत विद्यार्थ्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. चार्टर्ड अकाउंटंट मोहसीन शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या अनुभवावर प्रकाश टाकला. सेवानिवृत्त सैन्य अधिकारी तथा ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक सी. ए. तांबोळी यांनी विद्यार्थ्यांसोबत पालकांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, स्पर्धात्मक युगात शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच शारीरिक क्षमतेचे आणि मानसिक समतोलाचे मोठे महत्त्व आहे. संतुलन मिळवण्यासाठी खेळ उत्तम मार्ग आहे. खेळामुळे फक्त शरीर तंदुरुस्त राहत नाही, तर नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, सहकार्य, शिस्त आणि आत्मविश्वास यांसारखे गुणही विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतात.
कार्यक्रमात हाजी अ. रहेमान मणियार, तबरेज तांबोळी, अहेमद मेहबूब पटवेकर (नळेगाव), मो. कामील मणियार, सादीक अत्तार, एम. मैनोद्दीन मणियार आदी मान्यवरांचा इस्लामिक दस्ती, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक फाउंडेशनचे सहसचिव शादाब पटवेकर यांनी केले. सूत्रसंचालन गालिब शेख आणि रशीद कासार यांनी तर आभार फाउंडेशनचे अध्यक्ष सरफराज मणियार यांनी मानले. कार्यक्रमासाठी फाऊंडेशनचे सचिव प्रा. फारूक तांबोळी, उपाध्यक्ष पत्रकार के. वाय. पटवेकर, कोषाध्यक्ष हबीब मणियार, संस्थापक सदस्य गफार सय्यद, जाफर पटवेकर, फैयाज अत्तार, अॅड. उबेद अ. रहेमान मणियार, आबिद मणियार, ख्वाजा मनियार आदींनी परिश्रम घेतले.
