नागरिकांना शाश्वत पायाभूत सुविधा पुरविण्यावर राज्य शासनाचा भर
– — पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
· कासारशिरसी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
· जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित
· शासकीय विश्रामगृह, सा. बां. उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटन
· अपर तहसील कार्यालय, निवासस्थाने इमारत बांधकामाची पाहणी
कासारशिरसी – रस्ते विकास, पाणीपुरवठा योजना आणि प्रशासकीय इमारतींच्या बांधकामासारख्या विकासकामांद्वारे सर्वसामान्य नागरिकांना शाश्वत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर राज्य शासनाचा विशेष भर असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. कासारशिरसी येथील बसस्थानक परिसरात आयोजित विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. कासारशिरसी परिसरातील विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या प्रसंगी आमदार अभिमन्यू पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, कार्यकारी अभियंता गणेश क्षीरसागर, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता अनिता पाटील यांच्यासह सरपंच, स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कासारशिरसी येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालय आणि शासकीय विश्रामगृह इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. बसस्थानक परिसरातील काँक्रीटीकरणाचे कामही सुरू झाले आहे. या परिसरातील नागरिकांसाठी राज्य शासन विविध सुविधा उपलब्ध करत आहे. या भागातील विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे पालकमंत्री श्री. भोसले यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार प्रत्येक जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात 01 मे रोजी हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामुळे गरजू आणि गरीब रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी मुंबईला जाण्याची आवश्यकता राहणार नाही. जिल्हास्तरीय कक्षामार्फत त्यांना मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे पालकमंत्र्यांनी नमूद केले.
कासारशिरसी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विकासकामांना मंजुरी मिळाली असून, त्यापैकी अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. अपर तहसील कार्यालयाची इमारत, शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांच्या इमारतींचे बांधकाम गतीने सुरू आहे. रस्ते विकासालाही गती प्राप्त झाली आहे. लवकरच कासारशिरसी येथे महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
पालकमंत्री श्री. भोसले यांनी कासारशिरसी पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण केले. तसेच अपर तहसील कार्यालय आणि शासकीय अधिकारी-कर्मचारी निवासस्थानाच्या इमारतींच्या बांधकामाची पाहणी केली. बसस्थानक परिसरातील काँक्रीटीकरणाच्या कामांचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.प्रास्ताविकात सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंता अनिता पाटील यांनी कासारशिरसी परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली.
