• Thu. May 8th, 2025

लातूर जिल्ह्यात खरीप हंगाम 2025 साठी 11 तक्रार निवारण कक्ष स्थापन

Byjantaadmin

May 8, 2025

लातूर जिल्ह्यात खरीप हंगाम 2025 साठी 11 तक्रार निवारण कक्ष स्थापन

लातूर : खरीप हंगाम 2025 हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते आणि कीटकनाशके योग्य दराने उपलब्ध व्हावीत आणि त्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी लातूर जिल्ह्यात कृषी निविष्ठा केंद्रांची नियमित तपासणी केली जात आहे. यासोबतच, शेतकऱ्यांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर 1 आणि तालुकास्तरावर 10 असे एकूण 11 तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर.टी. जाधव आणि जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डी.टी. सुपेकर यांनी दिली.

शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांच्या खरेदीत अडचणी येऊ नयेत आणि गुणवत्तेसंदर्भातील तक्रारींचे त्वरित निराकरण व्हावे, यासाठी हे कक्ष कार्यरत असतील. तक्रारींसाठी शेतकऱ्यांनी लेखी अर्जासह खरेदी पावती, सातबारा, होल्डिंग आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तक्रार अर्जावर शेतकऱ्यांनी पत्ता, गाव, तालुका आणि भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा. तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीच्या कृषी अधिकारी कार्यालयात या तक्रारी नोंदवता येतील.

शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, पक्की पावती घ्यावी आणि त्यावर बियाणे उत्पादनाचा लॉट नंबर, उत्पादन दिनांक आदी माहिती तपासावी. नोंदणीकृत आणि लेबल क्लेम असलेल्या निविष्ठांचीच खरेदी करावी. खतांच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नसून, चढ्या भावाने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषी विभागामार्फत देण्यात आला आहे.

तक्रारींसाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचा व्हॉट्सअॅप क्रमांक: 8788091401/7588178787 आणि ई-मेल आयडी: [email protected] अथवा [email protected] उपलब्ध आहेत.  शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण निविष्ठांसाठी जागरूक राहावे, असे आवाहन श्री. जाधव आणि श्री. सुपेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *