ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचा लातूरमध्ये अभाविपकडून जल्लोष
बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात आनंदोत्सव; साखर वाटून भारतीय सशस्त्र दलांचे गौरवगान
लातूर, — भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत देशविरोधी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या निर्णायक कारवाईचे देशभरात जल्लोषात स्वागत केले जात आहे. या ऐतिहासिक कामगिरीचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) लातूर शाखेच्या वतीने बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात विशेष आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थित सर्वांना साखर वाटून देशाच्या वीर जवानांच्या यशाचे व त्यांच्या शौर्याचे गौरवगान करण्यात आले.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून लातूर महानगर मंत्री तेजुमई राऊत, जिल्हा सहसंयोजक भागवत बिरादार, सहमंत्री शुभम क्षीरसागर, ‘खेलो भारत’ संयोजक सोनिया जायभाय, रेवती माळी तसेच इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वक्त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या महत्त्वावर भाष्य करत भारतीय सशस्त्र दलांचे आभार मानले आणि त्यांच्या कार्याबद्दल अभिमान व्यक्त केला.तेजुमई राऊत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “भारतीय लष्कराने फक्त दहशतवाद्यांवर विजय मिळवला नाही, तर देशातील नागरिकांच्या मनामध्ये आत्मविश्वासाची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे. हा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आहे.”कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला