औसा उपजिल्हा रुग्णालयामुळे नागरिकांना अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध होतील– पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
· १०० खाटांच्या औसा उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन
लातूर,: औसा येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाची श्रेणीवृद्धी करून १०० खाटांचे पाचमजली उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात येत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. औसा येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
या समारंभास आमदार अभिमन्यू पवार, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, आरोग्य उपसंचालक डॉ. अर्चना भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, तहसीलदार घनश्याम अडसूळ, गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता पाटील, मुख्याधिकारी मंगेश शिंदे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे उपस्थित होते.
औसा तालुक्यात वीज, रस्ते, शिक्षण, पाणीपुरवठा आदी क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. यामुळे हा तालुका विकासाचे रोल मॉडेल बनले आहे. कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांमुळे येथील नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध होत आहेत. आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने आशिव ते जेवरी या सुमारे ४५० कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे आणि लामजना पाटी ते लातूर या सुमारे १६५ कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यांच्या जाळ्यामुळे दळणवळण सुधारेल आणि परिसराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास पालकमंत्री श्री. भोसले यांनी व्यक्त केला.
औसा तालुक्यात ६०० ते ७०० कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. गेल्या पाच वर्षांत सुमारे ३ हजार ७०० कोटी रुपयांची विकासकामे झाली आहेत. पुढील २५ वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन विविध कामांना मंजुरी मिळवली जात आहे. औसा येथील नवीन उपजिल्हा रुग्णालयात पुणे आणि मुंबईच्या धर्तीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. भविष्यात हे रुग्णालय आदर्श उपजिल्हा रुग्णालय म्हणून ओळखले जाईल, असे आमदार अभिमन्यू पवार यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध होणाऱ्या सुविधांची माहिती दिली. या रुग्णालयामुळे स्थानिक नागरिकांसह महामार्गावरील प्रवाशांनाही आरोग्य सुविधांचा लाभ मिळेल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.
