गुरुलिंग अशोक हासुरे यांच्या निर्घृण हत्येची सखोल चौकशी करा -सकल लिंगायत समाजाची निवेदनाद्वारे मागणी
निलंगा –तालुक्यातील बडूर येथील रहिवासी गुरुलिंग अशोक हासुरे यांच्या निर्घृण हत्येची सखोल चौकशी करून या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी. जलदगती न्यायालयात हा खटला चालवून या खून प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी सकल लिंगायत समाज बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी निलंगा यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

या बाबतचे सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील औंढा येथे महापुरुषाच्या मिरवणुकीवरून दिनांक 25 एप्रिल रोजी किरकोळ वादावादी झाली होती. दुसऱ्या दिवशी दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी औंढा गावात पुन्हा तोच वाद उफाळून आला आणि दोन गटांतील हाणामारीमुळे गोंधळ होऊन भांडणातील लोकांची पळापळ सुरू झाली. दरम्यान औंढा गावाजवळ रस्त्यालगत असलेल्या शेतात बडूर येथील रहिवासी शिक्षक गुरुलिंग अशोक हासुरे हे आपल्या शेतात काम करीत होते. गावातील आरडाओरडा , पळापळ व गोंधळ ऐकून शेतात काम करणारे शिक्षक गुरुलिंग हासुरे हे काय झाले हे पाहण्यासाठी रस्त्याजवळ येऊन थांबले असताना पळून जाणाऱ्या आरोपींनी हा सुद्धा औंढा येथीलच आहे असे म्हणत त्यास जबर मारहाण केली आणि या मारहाणीत शिक्षक गुरुलिंग अशोक हासुरे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अप्रिय, अमानवीय, निंदनीय , समाजमन सुन्न करणारी आहे. त्याची जेवढी निंदा व अवहेलना करावी तेवढे कमीच आहे.
या घटनेच्या निषेधार्थ निलंगा येथील सकल लिंगायत समाज बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी निलंगा यांना सोमवार दि 28 एप्रिल रोजी देण्यात आलेल्या निवेदनात या क्रूर हत्येच्या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी, या घटनेची सखोल चौकशी करून आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी, हा खटला जलगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, मयत गुरुलिंग हासुरे यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करुन व त्यांना तात्काळ शासकीय मदत देण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.