निलंगा आगारास त्वरीत नवीन बसेस द्या -काँग्रेसचे अभय साळुंखे यांची परीवहन मंत्र्यांकडे मागणी

-निलंगा
येथील आगारात सध्या ७० ते ८० बसेस आहेत. यापैकी बहुसंख्य बसेस या जुन्या झालेल्या असून कांही बसेस तर चालविण्या योग्य राहिल्या नाहीत. त्या केवळ भंगारात काढण्याच्या परिस्थितीत आहेत. नुकतेच निलंगा येथील श्री विभुते यांनी विवाह सोहळ्यासाठी बस करारावर बुक करून घेतली असता ती रस्त्यातच बंद पडली. त्यामुळे त्यांचे १२:३० चे नियोजीत असलेले लग्न दुपारी ०३:०० वाजता लागले. आयुष्यातला महत्वाचा लग्नसोहळा केवळ खराब व नादुरूस्त बस दिल्यामुळे बेरंग झाला. त्यामुळे तात्काळ निलंगा आगारासाठी नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी निवेदनाद्वारे परीवहन मंत्र्यांकडे केली आहे.
निवेदनात आगार महामंडळाकडून उदगीर, अहमदपूर व लातूर आगारास नवीन बसेस देण्यात आल्या. निलंगा आगारास गरज असताना नवीन बसेस न देता अन्याय करण्यात आलेला आहे. निलंगा आगार नेहमीच फायद्यातील आगार असून त्या आगारात दररोज निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ तसेच कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी येतात. निलंगा तालुक्यातील ग्रामीण भागातून विद्यार्थी व मोठ्या प्रमाणात नागरिक निलंग्याला ये-जा करत असतात. त्यांना नेहमीच खराब बसेसचा फटका बसत आहे. वाटेत अचानक बस बंद पडत असल्याने कोणी विवाह सोहळ्यासाठी बस बुक करण्यासाठी पुढे येत नाही, अशी दयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे निलंगा आगारास प्राधान्याने बसेस मिळणे आवश्यक असताना स्थानिक आमदार व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अन्याय होत आहे. प्रवाशांची सोय व महामंडळाचा फायदा लक्षात घेता निलंगा आगारास कमीत कमी १० बसेस तात्काळ देण्यात याव्यात अशी मागणी करत गांभीर्याने दखल घेतली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा अभय साळुंके यांनी निवेदनातून दिला.