उमरगा (हा.) येथील पाणीटंचाईचा तहसीलदार, गट विकास अधिकाऱ्यांकडून आढावा

लातूर,: निलंगा तालुक्यातील उमरगा (हा.) येथील पाणीपुरवठ्याबाबत तहसीलदार प्रसाद कुलकर्णी आणि गट विकास अधिकारी सोपान अकिले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी गावातील पाणीपुरवठ्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. निलंगा महसूल मंडळ अधिकारी आणि उमरगा (हा.) येथील तलाठी यावेळी उपस्थित होते.
उमरगा (हा.) येथे सुरू असलेल्या जल जीवन मिशनच्या कामाची तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी पाहणी करून माहिती घेतली. हे काम पुढील चार ते पाच दिवसांत पूर्ण होईल, असे संबंधित ठेकेदाराने सांगितले. गावातील सार्वजनिक विहीर आणि विंधनविहिरीतील पाणी पुढील काही दिवस पुरेल, असेही यावेळी सांगण्यात आले. पाणीटंचाईच्या समस्येवर उपाय म्हणून बोअर किंवा विहीर अधिग्रहण अथवा टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी प्रस्ताव पाठवण्याबाबत संबंधितांना मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी दिली.