भटके विमुक्त, बहुजनांचा आधारवड, कत्तिकार,साहित्यिक विलास माने यांचे निधन…
निलंगा,
फुले,शाहू,आंबेडकरांचे विचार जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासह वंचितांसाठी लढा देणारा लढवय्या भटके विमुक्तांचा (नेता) शिलेदार आणि चळवळीचा भाष्यकार विलास बाबुराव माने यांचे दि.१८ रोजी सकाळी ०६ वाजता त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
निलंगा तालुका हा मानवतावादी – आंबेडकरवादी चळवळीचे केंद्र म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते. या महनीय शृंखलेमध्ये विलास माने यांनी फुले,शाहू,आंबेडकर यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा मागोवा व सुनिश्चित दिशा आपल्या प्रतिभेतून एक निष्ठावंत कार्यकर्ता,वक्ता, नेता,साहित्यिक म्हणून स्पष्ट आणि प्रभावीपणे मांडण्याचे काम केले. त्याचबरोबर निलंगा तालुक्यातील व संपूर्ण मराठवाड्यातील गोरगरिबांच्या शिक्षणासाठी श्रमिक विकास संस्था अंतर्गत त्यांनी निलंगा येथे प्रतिभाताई पवार माध्यमिक आश्रमशाळा व वेणूताई चव्हाण प्राथमिक आश्रमशाळा सुरुवात करुन बहुजनांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दार खुले करून दिले. त्यांच्या आकस्मित जाण्याने मोठा धक्का बसला असून फुले,शाहू,आंबेडकर चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. एक सच्चा भाष्यकार गेल्याने जिल्हाभरात अतीव दुःखाचे सावट पसरले आहे. त्यांच्या जीवन कार्याचा आदर्श घेऊन नव्या पिढीने लिहिते राहून सामाजिक प्रश्नांना न्याय मिळवून देणे सदोदित मानवतावादी – आंबेडकरवादी चळवळ गतिमान करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.
दलित बहुजनाचा बुलंद आवाज आज काळाच्या पडद्या आड झाल्याने मनाला वेदना देणारी घटना आहे.अशा या महान कृर्तत्वान बहुजन नेत्याला अखेरचा जय भीम..
त्यांच्या पार्थिव देहावर दि.१८ एप्रिल २०२५ रोजी शुक्रवारी येथील शांतिवन सार्वजनिक स्मशान भूमीत भिक्खू सुमेधजी नागसेन व उपराकार लक्ष्मण माने यांच्या प्रमुख उपस्थितीत व हजारो भटके विमुक्त जाती जमाती व चाहत्यांच्या,कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बौद्ध पद्धतीने सायंकाळी (०४:००) वाजता अंतिमसंस्कार होणार आहेत.असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा ,सून दोन, मुली जावई नातवंडे व पुतणे असा मोठा परिवार आहे.