विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा : श्रीशैल्य उटगे
लातूर : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत लातूर जिल्ह्यातील सहा पैकी तीन जागा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने लढविल्या. त्यापैकी केवळ एका जागेवर काँग्रेसला विजय मिळाला. उर्वरित दोन जागांवर पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द केल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी मंगळवारी लातुरात पत्रकारांशी बोलताना दिली.
लातूर शहरातील काँग्रेस भवन मध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी पत्रकारांशी सुसंवाद साधला. आपल्या साडेचार वर्षांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कार्यकाळात केलेल्या कार्याचा संक्षिप्त अहवाल त्यांनी यावेळी सादर केला. काँग्रेसच्या लातूर जिल्हाध्यक्षपदाचा पदभार आपण दि. २४ जून २०२० रोजी स्वीकारल्याचे सांगून उटगे पुढे म्हणाले की, जिल्हा काँग्रेसमधील नेत्यांची वयोमर्यादा ६५ वर्षावरुन आपण ३५ ते ५० या वर्ष वयोगटात आणली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये लातूर जिल्ह्यातून तीस हजारांहून अधिक काँग्रेस पदाधिकारी घेऊन सक्रिय सहभाग नोंदविला . कोरोना काळात लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस प्रशासन, ४८ आरोग्य केंद्र , महानगरपालिका, नगर परिषदमधील सर्व स्वच्छता कर्मचारी , जिल्ह्यातील सर्व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना पीपीटी किट, मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिमीटरचे वाटप केले. कोरोना काळात गरजू लोकांसाठी २१ हजार अन्नधान्य किट वाटप करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. जिल्हा काँग्रेसच्या वतीने कोविड टास्क फोर्सची स्थापना करून हजारो रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली. शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने भव्य ट्रॅक्टर रॅलीचे यशस्वी आयोजन केले. त्यासाठी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीची मोहीम राबवून एक लाखहुन अधिक शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचा अहवाल प्रदेश कमिटीकडे सादर केला. आजादी गौरव यात्रेचे आयोजन करून लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार क्षेत्रात एकूण १०६ किलोमीटर पदयात्रा केली. आ. अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करून तब्बल २ हजार ५५३ रक्त बॅगांचे संकलन केले. जिल्हा काँग्रेसच्या वतीने मोफत नेत्रतपासणी शिबिरामध्ये ८ हजार ५०० ते ९ हजार रुग्णांची तपासणी करून त्यापैकी ९५६ नेत्र रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया व चष्म्याचे वाटप करण्यात आले. इंधन दरवाढी विरोधात सायकल रॅली काढून निषेध व्यक्त केला. सभासद नोंदणीमध्ये लातूर जिल्ह्यातून २ लाख १ हजार २९० डिजिटल सभासद नोंदणी करून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. हात से हात जोडो अभियान, मराठवाडा विभागीय बैठक, जेल भरो आंदोलन, चिखल फेको आंदोलन, राज्यातील काँग्रेसच्या खासदारांच्या सत्काराचे आयोजन, राज्यात सर्वाधिक २९ सेल कार्यान्वित असणारा एकमेव जिल्हा अशी लातूरची ओळख निर्माण करण्यास अनेक समाजोपयोगी कामे आपल्या कार्यकाळात पार पाडल्याचे उटगे यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत लातूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे विक्रमी मतांनी निवडून आले. पण, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जिल्ह्यात तीन पैकी एकाच जागेवर निवडणूक जिंकता आली. उर्वरित दोन विधानसभा मतदार संघात पक्षाला प्रभाव स्वीकारावा लागला. त्या पराभवाची नैतिक जबाबदारी ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष या नात्याने आपली असल्याचे मान्य करून आपण आपल्या पदाचा राजीनामा पक्षाच्या प्रांताध्यक्षांकडे सुपूर्द केल्याचे श्रीशैल्य उटगे यांनी सांगितले. आपल्या राजीनाम्याबाबत आपण जिल्ह्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात पक्ष सोपवले ती जबाबदारी आपण सक्षमपणे पार पाडण्यास तयार आहोत. जिल्हाध्यक्षपदाच्या काळात सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी, नेते, मान्यवरांचे आपण आभार मानतो,असेही श्रीशैल्य उटगे यांनी बोलून दाखविले. यावेळी अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष एड.बाबासाहेब गायकवाड, लातूर तालुका अध्यक्ष सुभाष घोडके, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष सिराजोद्दिन जहागीरदार, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण,ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. एकनाथ पाटील, डॉक्टर विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अरविंद भातांब्रे, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी,लातूर काँग्रेस कमिटीचे समन्वयक प्रा. ओमप्रकाश झुरळे ,ग्राहक संरक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष सोनू डगवाले, व्हीजीएनटी विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश चव्हाण, क्रीडा विभागाचे जिल्हाध्यक्ष बालाजी साळुंखे,एनएसयुआय विभागाचे जिल्हाध्यक्ष रामराजे काळे, औसा पंचायत समितीचे माजी सदस्य प्रकाश मिरगे, संजय लोंढे , धैर्यशील भोसले, विक्रम गरड, मुकेश बिदादा आदी उपस्थित होते.