अभाविप लातूर शाखा द्वारा आयोजित स्वामी विवेकानंद चषक २०२५ भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न
दयानंद कला महाविद्यालय संघाचा शानदार विजय, महाराष्ट्र महाविद्यालय किल्लारी संघ उपविजेता
लातूर/प्रतिनिधि – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व खेलो भारत, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वामी विवेकानंद चषक २०२५ भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचा शानदार समारोप झाला. ही स्पर्धा २७ व २८ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला होता.स्पर्धेचे उद्घाटन अभाविप लातूर विभाग संघटन मंत्री अजित केंद्रे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख उपस्थितीत प्रदेश सहमंत्री सुशांत एकोर्गे, महानगर मंत्री तेजुमई राऊत, महानगर खेलो भारत संयोजक प्रतिक बारबोले, ज्ञानेश्वर बिरादार, ऋत्विक मोरे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यात खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण होते, तर प्रेक्षकांनी देखील मोठ्या संख्येने हजेरी लावली.
अंतिम सामना थरारक, दयानंद कला महाविद्यालय संघाचा विजय
स्पर्धेतील अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरला. दयानंद कला महाविद्यालय संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम पारितोषिक पटकावले, तर महाराष्ट्र महाविद्यालय किल्लारी संघाने उत्तम कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. दोन्ही संघांमध्ये रंगतदार लढत पाहायला मिळाली. स्पर्धेतील विजयी संघांना रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रथम पारितोषिक: दयानंद कला महाविद्यालय संघ ₹७,००० रोख बक्षीस तर द्वितीय पारितोषिक: महाराष्ट्र महाविद्यालय किल्लारी संघ ₹५,००० रोख बक्षीस देण्यात आले. आणि या स्पर्धेचा समारोप महानगर अध्यक्ष प्रा. प्रसाद कदम सर यांच्या हस्ते करण्यात आला.या स्पर्धेमुळे लातूर जिल्ह्यातील व्हॉलीबॉल खेळाडूंना एक उत्तम व्यासपीठ मिळाले. खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य आणि संघभावनेचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. आयोजकांनी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
अभाविपच्या पुढाकाराने भविष्यात मोठ्या स्पर्धांचे आयोजन
अभाविपच्या पुढाकाराने लातूरमध्ये अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन वारंवार करण्यात येत आहे. भविष्यात आणखी मोठ्या स्पर्धा घेऊन स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला. स्वामी विवेकानंद चषक २०२५ स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल अभाविप लातूर, खेलो भारत संघटन आणि सर्व कार्यकर्त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
