लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी निधीचे समन्यायी पद्धतीने वाटप व्हावे
निधीचा गैरव्यवहार होणार नाही याची दक्षता घ्यावी लातूरची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मागण्या
लातूर प्रतिनिधी : माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची लातूर शहरातील बार्शी
रोडवरील नवीन जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन समिती बैठकीला
उपस्थिती. ही बैठक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर
जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली
संपन्न झाली. जिल्हाधिकारी कार्यालय येथील संविधान उद्देशिका प्रतिकृतीचे
मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.
यावेळी दूरदर्शन प्रणाली द्वारे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील,
शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर,
माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा
ठाकूर घुगे, पालक सचिव मनीषा म्हैसकर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,
लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, महानगरपालिका
आयुक्त बाबासाहेब मनोहरे आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की,
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नव्या उमेदीच्या छत्रपती
शिवेंद्रसिंह अभयसिंह राजेभोसले यांना जबाबदारी मिळाल्याबद्दल त्यांचे
अभिनंदन केले, माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि माजी
मंत्री आदरणीय छत्रपती अभयसिंह राजेभोसले यांचे अत्यंत स्नेहाचे,
जिव्हाळ्याचे संबंध होते, त्यांच्या सातारा येथील अजिंक्यतारा साखर
कारखान्याची प्रेरणा घेऊनच लातूर येथे मांजरा शेतकरी साखर कारखान्याची
उभारणी झाली आणि त्यातून या जिल्ह्याचा कायापालट झाला आहे या आठवणींना
उजाळा देऊन छत्रपती शिवेंद्रसिंह राजेभोसले लातूर जिल्ह्याच्या विकास
प्रक्रियेत पक्षाभिनवेश बाजूला ठेवून सकारात्मकतेने निर्णय घेतील असा
विश्वास यावेळी व्यक्त केला. अत्यंत गतीने प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण
करीत असलेल्या लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने,
कोणताही भेदभाव न करता समन्यायी पद्धतीने निधीचे वाटप करण्यासाठी नूतन
पालकमंत्री पुढाकार घेतील. विकास कामासाठी येणारा निधी त्याच कामावर
योग्य पद्धतीने खर्च होईल, या निधीमध्ये कोणत्याही पद्धतीचा गैरव्यवहार
होणार नाही, त्याचबरोबर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित
राखण्याच्या दृष्टीने ही प्रयत्न होतील, एकंदरीत लातूर जिल्ह्याचा लौकिक
पूर्वीप्रमाणेच कायम राहील असा विश्वास या प्रसंगी माजी मंत्री आमदार
अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला.
लातूर जिल्ह्यातील सध्या प्रगतीपदावर असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी
तसेच नियोजित प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी नूतन पालकमंत्री
पुढाकार घेतील अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.लातूर जिल्हा आता अनेक
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाने जोडला गेला आहे उर्वरित कामे दर्जेदार
पद्धतीने पूर्ण व्हावीत, लातूर विमानतळ विस्तारीकरणाचे काम लवकरात लवकर
पूर्ण करून येथून उडान योजनेत विमानसेवा सुरू करावी, जिल्हा
रुग्णालयाच्या उभारणी कामाला आता गती द्यावी. उद्योग, व्यापार आणि
शिक्षणाचे केंद्र म्हणून नावारूपाला आलेले लातूर आता आरोग्यसेवेचे केंद्र
म्हणून पुढे येत आहे त्यामुळे त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पूरक सुविधा
निर्माण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, शेती उत्पादन वाढीच्या
दृष्टीने वीजपुरवठा नियमित राहील याची दक्षता घ्यावी, उद्योजकानाही
वीजपुरवठा सुलभ पद्धतीने मिळण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत त्यात
लक्ष घालावे, सिकंदरपुर व एमआयडीसीतील वीज उपकेंद्र उभारणीला प्राधान्य
द्यावे.लातूर जिल्ह्यातील शेतकरी प्रयोगशील असल्यामुळे येथे फुले, फळे
आणि भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे, ही बाब लक्षात घेऊन
यासाठीच्या स्वतंत्र बाजारपेठ निर्मितीसाठी शहराच्या जवळपास जागा उपलब्ध
करून द्यावी, त्याचबरोबर दयानंद गेट समोरील आणि गंजगोलाई भागातील
भाजीपाला, फळे विक्रेत्यांसाठी त्वरित पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी
आदी मागण्या या बैठकीदरम्यान माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
यांनी केल्या. लातूर शहर व जिल्ह्यातील मूलभूत सोयी, सुविधा आणि विकास
प्रकल्पाच्या संदर्भानेही कांही निवेदनेही पालकमंत्री महोदयांकडे यावेळी
सादर केली आहेत. पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी माजी मंत्री आमदार
अमित विलासराव देशमुख यांनी माडलेल्या सर्व विषयांना सकारात्मक प्रतिसाद
दिला आपण सर्व लोकप्रतिनिधी मिळून काम करूया अशी ग्वाही त्यांनी दिली.
