अॅट्रोसीटी कायदा सुधारणा अधिनियम बाबत कार्यशाळा संपन्न…
प्रतिनिधी / निलंगा : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ व सुधारीत अधिनियम २०१६ या विषयावर टाऊन हॉल येथील डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर सांस्कृतिक सभागृहात शनिवार (दि २५) रोजी निलंगा पंचायत समितीच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.टी.भालेकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, व्यासपीठावर गटविकास अधिकारी सोपान अकेले, गटशिक्षणाधिकारी सुरेश गायकवाड, सरकारी अभिवक्ता अॅड कपिल पंढरीकर, अॅड, एस. व्ही धैर्य, अॅड पवार, बांधकाम विभागाचे उपअभियंता कुलकर्णी, नागशेन कांबळे, शिक्षण विस्तार अधिकारी संजय सूर्यवंशी, पर्यवेक्षिका संगीता गुरव अदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना न्यायाधीश भालेराव यांनी समाजातील स्त्री व पुरूष समानता याबाबत मार्गदर्शन करत महिलांची वृत्ती सहन करण्याची झाली आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे की, गुलामाला गुलामीची जाणिव करुन द्या तेव्हाच तो बंड करून उठेल तशी वेळ महिलांवर आली आल्याचे सांगत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याबाबत मार्गदर्शन केले. तर अनुसूचित जाती व जमाती कायदा कशासाठी तयार करण्यात आला. अन्याय झाल्यावर कायद्याचा कशाप्रकारे वापर करायचा याबाबत अॅड कपिल पंढरीकर व अॅड पवार यांनी सखोल मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय समारोपात तहसीलदार कुलकर्णी यांनी आपण सर्व भारतीय एकसंघ आहोत हिच शिकवण या कार्यशाळेतून प्रत्येकांनी घेऊन यावी असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक गटविकास अधिकारी सोपान अकेले यांनी केले. यशस्वीतेसाठी बालाजी मोहोळकर, लिंबाजी धैर्य, दत्ता खटके, सुजीत चांदोरीकर अदींनी परिश्रम घेतले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते धम्मानंद काळे, गोविंद सूर्यवंशी, संजय सुरवसे, किशोर सोनकांबळे सह पंचायत समितीचे कर्मचारी, शालेय विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
