सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची छावा संघटनेची मागणी….
प्रतिनिधी / निलंगा : हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी सरकारने दिलेली डेडलाईन ३१ जानेवारी रोजी संपत असून आणखीन हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांचे सोयाबीन विक्री करणे बाकी असल्याने मुदतवाढ द्यावी व खरेदी टारगेट वाढवून द्यावे, असे अशी मागणी छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली.
केंद्र सरकारने हमीभावाने शेतमाल खरेदीचा कायदा केला. सोयाबीनचा हमीभाव ४८९२ रुपये असताना आजरोजी कृषी उत्पन्न बाजार समितीत ४ हजार रुपयांच्या आसपास भाव मिळत आहे. हमीभावाने खरेदीसाठी सरकारने नाफेडच्या माध्यमातून मोजक्याच ठिकाणी खरेदी केंद्र सुरू केले. त्याही ठिकाणी बारदान्या अभावी खरेदी केंद्र मध्यंतरी बंद चालू होत होते. त्यातच सरकारने ३१ जानेवारीपर्यंतच खरेदीची डेडलाईन दिली. चार दिवस अगोदरच लातूर जिल्ह्याचे खरेदी टारगेट संपणार असल्याने डेडलाईन संपण्यापूर्वीच खरेदी केंद्र बंद पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अजून हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी बाकी आहे. प्रत्येक खरेदी केंद्रावर शंभरपेक्षा जास्त वाहने उभी आहेत. सरकारने किमान १५ दिवस खरेदीची वेळ व जिल्ह्यासाठी टारगेट वाढवून द्यावे, अशी मागणी छावाचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके यांनी केली आहे.
