सामाजिक विषमता मातीत गाढायचे काम वारकरी संप्रदायाने केले – ह भ प मधुकर महाराज बारूळकर
कीर्तन महोत्सव दिवस दुसरा
निलंगा प्रतिनिधी /- रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन ऐकत होते असे इतिहासात अनेक दाखले आहेत.कीर्तनकार परिवर्तनवादी असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा प्रजाहितदक्ष पराक्रमी राजा तयार होऊ शकतो एवढी ताकत कीर्तनात असून सामाजिक विषमता मातीत गाढायचे काम सुद्धा वारकरी संप्रदायाने केले आहे असे प्रतिपादन मधुकर महाराज बारूळकर यांनी केले.
येथील जिजाऊ सृष्टीत मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या कीर्तन महोत्सवातील दुसऱ्या दिवशी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर होते. यावेळी उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भरत गोरे, अनंतराव गायकवाड, विशेष सत्कारमूर्ती उद्योजक उदय पाटील,सतिष हानेगावे उपस्थित होते.मधुकर बारूळकर महाराज म्हणाले वारकऱ्यांच्या झेंड्याखाली अठरा पगड जातींना एकत्र करून समाज प्रबोधन करण्याचे काम संतांनी केले आहे त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे.वारकऱ्यांनी महिलांना प्रोत्साहन दिले म्हणून महिलांनी सामाजिक क्रांती केली.महिलांना कमी लेखण्याची चूक कोणीही करू नये महिला सक्षम झाल्या तरच राष्ट्राची प्रगती होऊ शकते असे ते म्हणाले.
माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची उपस्थिती….
गेली सतरा वर्षांपासून मराठा सेवा संघाने अविरतपणे सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम सुरू ठेवल्याबद्दल माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आयोजकांचे कौतुक केले व ही प्रबोधनाची परंपरा कायम ठेवावी अशी इच्छा व्यक्त केली.तुकोबारायांची भक्ती अन शिवरायांची शक्ती हा भक्ती-शक्ती चा संगम आहे असे ते म्हणाले…तसेच जिजाऊसृष्टीच्या संरक्षण व विकासासाठी अडचण येणार नाही असे ते म्हणाले.प्रस्ताविक सतिष हानेगावे यांनी केले.सूत्रसंचालन एम एम जाधव तर आभार विनोद सोनवणे यांनी मानले.यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,डी बी बरमदे,दगडू सोळुंके, डॉ.अरविंद भातांब्रे, चक्रधर शेळके,ईश्वर पाटील,प्राचार्य रमेश मदरसे, चंद्रकांत पाचंगे, रोहित बनसोडे, रजनीकांत कांबळे, दत्ता शाहीर, अंकुश ढेरे,सदाशिव लोभे,आर एन बरमदे,आर के नेलवाडे,दत्तात्रय बाबळसुरे, किरण धुमाळ, बालाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
