सोयाबीनची हमीभावाने खरेदी होत नाही तोपर्यंत केंद्र बंद करु नका
माजी आमदार धिरज देशमुख यांची सोयाबीन खरेदी केंद्राला भेट देवून संतप्त शेतकऱ्यांशी संवाद साधला:
पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी दूरध्वनीवरून केली चर्चा
लातूर / प्रतिनिधी
केंद्र सरकारने नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी सुरु केली आहे़ त्यासाठी लातूर जिल्ह्यातील हजारो शेतक-यांनी नोंदणी केली आहे़ परंतु, लातूर जिल्ह्याचा कोटा संपला या सबबीखाली पोर्टल बंद करण्यात आले़. त्यामुळे नाफेडमार्फतची सोयाबीन खरेदी ठप्प झाली आहे़. खरेदी केंद्रांवर आठ दिवसांपासून सोयाबीनची वाहने उभी आहेत़. वाहन भाड्याचा भुर्दंड शेतक-यांना बसतो आहे़ त्यामुळे सरकारने सोयाबीनची हमीभावाने खरेदी होत नाही तोपर्यंत केंद्र बंद करु नये, अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली आहे़.
लातूर तालुक्यातील नागझरी येथील विकास अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लि़ च्या नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्राला २८ जानेवारी रोजी भेट दिली़. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, अनुप शेळके, रेणापूर बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे, लातूर बाजार समितीचे संचालक सुभाष घोडके, शेषराव हाके, विकास ॲग्रोचे विलास उफाडे आदीसह सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्याकडे व्यथा मांडल्या.
माजी आमदार धिरज देशमुख म्हणाले, सरकारनेच नाफेडमार्फत हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याचे जाहीर केले़ त्यासाठी आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले़ लातूर जिल्ह्यातील हजारो शेतक-यांनी जिल्ह्यातील नाफेडच्या ५४ केंद्रांवर नोंदणी केली़ नोंदणी केलेल्या शेतक-यांना ओटीपी मिळाला़ ओटीपी मिळाल्यानंतर शेतकरी नाफेड केंद्रांवर सोयाबीनचे ट्रॅक्टर घेऊन गेले़ परंतू, सोयाबीन खरेदीचा लातूर जिल्ह्याचा कोटा संपला या सबबीखाली सरकारने पोर्टल बंद केले़ त्यामुळे आजघडीला जिल्ह्यातील सोयबीन खरेदी ठप्प झाली आहे़ नाफेडच्या खरेदी केंद्रांवर वाहनांच्या रांग लागलेल्या आहेत़ गेल्या आठ दिवसांपासुन खरेदी केंद्रांवर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत़ जागेवर उभ्या वाहनांना दिवसाला २ हजार रुपये भाडे द्यावे लागत आहे़ सरकार शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहे.
खरेदी केंद्रावरुन थेट मंत्र्यांना फोन
यावेळी माजी आमदार धिरज देशमुख यांनी सोयाबीन उत्पादक शेतक-यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणुन घेतल्या आणि नाफेड अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्या कानावर घातल्या. सोयाबीन खरेदीची प्रक्रिया शेतक-यांसाठी कशी अडचणीचे ठरत आहे़ लातूर जिल्हा सोयाबीन उत्पादनात अग्रेसर असताना यंत्रणेने ठरवलेला कोटा कोणत्या आधारावर ठरवला? याबाबत विचारणा केली. राज्याचे पणन मंत्री श्री. रावल यांनाही दूरध्वनी केला. परिपत्रक काढून नाफेडमार्फत सोयाबीन खरेदीला मुदतवाढ आणि सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झालेल्या जिल्ह्यांना वाढीव उद्दिष्ठ देण्यात येईल, असे आश्र्वासन देवून राज्याचे पणन मंत्री श्री. रावल यांनी धिरज विलासराव देशमुख यांच्या मागण्या मान्य केल्या.
