अंबुलगा बु.ग्रामपंचायतीकडून आदर्श ग्राम शिक्षक पुरस्कार
निलंगा /प्रतिनिधी :तालुक्यातील अंबुलगा बु. येथील ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद प्रशाला व इंदिरा कन्या माध्यमिक विद्यालयातील सहा शिक्षकांचा आदर्श ग्रामशिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
सरपंच सौ.स्वाती शिंदे, किरण बिरादार, ग्रामसेवक दीपक कांबळे, महावीर काकडे, संदीप पाटील, मुख्याध्यापक शिवशंकर मिरगाळे व मान्यवरांच्या हस्ते या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना घडविणारे शिक्षक श्रीमती सविता पटणे, शाम गिरी, सिद्धार्थ सोमवंशी, दिनेश कांबळे, विवेक नागटिळक व सचिन होसुरे यांना सन्मानित करण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची तालुक्यात प्रशंसा केली जात आहे. सर्व ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य तसेच शिक्षक संघटनांच्या वतीने या शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.
