• Tue. Apr 29th, 2025

कुक्कुटपालकांमध्ये बर्ड फ्ल्यूविषयी जनजागृती करावी- मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर

Byjantaadmin

Jan 28, 2025

कुक्कुटपालकांमध्ये बर्ड फ्ल्यूविषयी जनजागृती करावी– मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर

लातूर : जिल्ह्यातील सर्व पोल्ट्री फार्मची नोंदणी करून कुक्कुटपालकांच्या बैठका घ्याव्यात. तसेच बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी दिल्या. जिल्हा परिषद येथे झालेल्या पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते.

पशुसंवर्धन प्रादेशिक सहआयुक्त डॉ. नाना सोनवणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर, सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सुधाकर साळवे यांच्यासह सर्व तालुक्यांचे पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते.बर्ड फ्ल्यू विषयक जनजागृतीसाठी माहिती फलक लावावेत. तसेच जिल्ह्यातील चिकन, मटण विक्रेत्यांना स्वच्छता व आवश्यक काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करावे. जिल्ह्यात कुठेही कुक्कुट पक्ष्यांमध्ये बर्ड फ्ल्यूची लागण झालेली नाही, त्यामुळे चिकन, अंडी सेवन करणे सुरक्षित आहे. नागरिकांनी चिकन व अंडी शिजवून खावीत. बर्ड फ्ल्यूविषयक अफवांवर विश्वास ठेवू नये. या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाने सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे श्री. सागर यांनी सांगितले.

शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व पशुधनाला जंत निर्मूलनासाठी औषधांचे वाटप करण्याची मोहीम गतिमान करावी. प्रत्येक गावात पशुरोग निदान व उपचार शिबीर घेवून पशुधनाची तपासणी करावी. जिल्ह्यातील सर्व शेळ्या आणि मेंढ्यांना पीपीआर रोगाचे लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे श्री. सागर यावेळी म्हणाले.जिल्ह्यातील पशुगणना, कृत्रिम रेतन, वासरे जन्म दर, शस्त्रक्रिया व गर्भ तपासणी यामध्ये वाढ करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करणे आदी विषयांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed