एसटीची भाडेवाढ त्वरित मागे घ्या -धिरज विलासराव देशमुख यांची मागणी
राज्य सरकारला पाठवले पत्र
लातूर/प्रतिनिधी
महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बसच्या तिकीट दरात एकाचवेळी थेट 15 टक्के वाढ करण्याचा निर्णय सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत जाचक आहे. राज्य सरकारने पुनर्विचार करून राज्यातील जनतेवर लादलेला निर्णय तातडीने मागे घ्यावा. अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली.
एसटीच्या तिकीटांची भाडेवाढ राज्यात आजपासून लागू झाली आहे. त्यामुळे शहरातील आणि खेडोपाड्यातील सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याची दखल घेत लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांना पत्र पाठवत एसटीची भाडेवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे.
राज्याच्या प्रमुखांना (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री) विचारात न घेता, मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा न करता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारा जाचक निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. वाढलेली महागाई, शेतमालाचे पडलेले भाव यामुळे सर्वसामान्य माणूस आधीच त्रासलेला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहेत. तरुणांच्या हाताला काम नाही. याचा विचार न करता एसटी भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. असे धिरज विलासराव देशमुख यांनी सांगितले.
घोषणेचा पडला विसर
विधानसभा निवडणुकांच्या आधी एसटीची भाडेवाढ करण्यात येणार होती. त्यावेळी ‘आम्ही एसटीच्या तिकीट दरात कसलीही वाढ करणार नाही’ अशी घोषणा महायुती सरकारने केली होती. निवडून आल्यानंतर, प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर सरकारला आपल्या घोषणेचा विसर पडलेला दिसत आहे. अशी नाराजी धिरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली.
