अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करा-धिरज विलासराव देशमुख
केंद्रीय कृषिमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यांना पाठवले पत्र
लातूर/प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देवू, असे आश्र्वासन देवून राज्यात सत्तेत आलेल्या महायुती सरकारने तातडीने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. येणाऱ्या अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा करून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी केली.
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी केंद्रीय कृषिमंत्री श्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्री धिरज विलासराव देशमुख यांनी पत्र पाठवले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे तर मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. यात राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देवून दिलासा द्यावा, अशी मागणी श्री धिरज विलासराव देशमुख यांनी केली.
मागील 2024 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने बिहार राज्याला 26 हजार कोटींचा भरीव निधी मंजूर केला होता. तर आंध्रप्रदेशला 15 हजार कोटींचा भरीव निधी जाहीर केला होता. आता महाराष्ट्रात महायुतीची सत्ता असल्याने केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भरीव निधीची घोषणा करावी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महायुतीतील नेत्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी आश्वासन दिले होते. वचननाम्यातही लेखी आश्वासन जनतेला दिलेले आहे. ते पूर्ण करावे, असे श्री धिरज विलासराव देशमुख यांनी सांगितले.
तेलंगणा येथे काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्याच बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. त्या धर्तीवर आपल्याही राज्यात निर्णय होणे अपेक्षित होते. राज्यात इतके मोठे बहुमत मिळाल्यानंतर महायुतीने मन मोठे करून शेतकऱ्यांना लगेच कर्जमाफी द्यायला हवी होती. पण आता कर्जमाफी बद्दल सत्तेतील नेते बोलायला तयार नाहीत. त्यामुळे आमची फसवणूक झाली, अशी भावना शेतकरीवर्गात वाढू लागली आहे. शेतीमालाचे पडलेले भाव, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करून दिलासा द्यावा, अशी माझी सरकारकडे मागणी आहे, असे श्री धिरज विलासराव देशमुख म्हणाले.
