निलंगा तालुक्यातील दुहेरी हत्याकांड प्रकरणी तिन्ही आरोपी अटकेत, चार दिवसांची पोलीस कोठडी
निलंगा : शेत जमिनीच्या वादावरुन तीन भावंडांनी मिळून भावाचा आणि पुतण्याचा खून केल्याची घटना निलंगा तालुक्यातील उस्तुरी शिवारात गुरुवारी (दि. १६) घडली होती. मोठ्या भावाने विकत घेतलेल्या साडेचार एकराच्या वाटणीवरुन भावाभावामध्ये वाद होते. अखेर हाच वाद विकोपाला पोहोचला आणि यामध्ये बाप-लेकाला जीव गमवावा लागला. याप्रकरणी तीन आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
उस्तुरी येथील दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला असुन केवळ शेताच्या वाटणीवरून झालेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केले जात आहे. मयत सुरेश आणेप्पा बिराजदार यांना एकूण चार भावांडे. सर्वात मोठा भाऊ सुरेश त बाकीचे चार लहान होते. मागच्या काळात सुरेश बिराजदार याने साडेचार एकर जमीन विकत घेऊन बायकोच्या व मुलाच्या नावे केली होती. ही जमीन एकत्र असताना घेतली होती, म्हणून त्याचीही वाटणी व्हायला हवी. यावरुन भावांडामध्ये वाद चालू होता. सुरेश यांनी जमीन
वाटून देण्यास नकार दिला, याचाच राग मनात धरून बसवराज आणेप्पा बिराजदार, सुनील बिराजदार, लखन बिराजदार (एका भावाचा मृत्यू झाला आहे) यांनी संगणमत करुन सुरेश बिराजदार, गणेश बिराजदार, साहील बिराजदार यांच्यावर अचानक लाठ्याकाठ्या व कोयत्याने मारहाण केली. या मारहाणीत सुरेश बिराजदार व मुलगा साहिल बिराजदार जागीच मृत्यू झाला तर दुसरा मुलगा गणेश बिराजदार हा गंभीर जखमी झाला त्याच्यावर लातूर येथे उपचार चालू आहेत. मयत सुरेश आणेप्पा बिराजदार यांचा मेहुणा सुभाष हाबरे यांच्या फिर्यादिवरुन आरोपी बसवराज बिराजदार, सुनिल बिराजदार, लखन बिराजदार यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर १७/२०२५ कलम १०३, १०९, ३(५) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण राठोड करीत आहेत. आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
