• Sun. Jun 15th, 2025

घाबरु नका परंतु सतर्क रहा एच. एम. पी. व्ही.  आजाराबाबत लातूर मनपाचे आवाहन

Byjantaadmin

Jan 9, 2025

घाबरु नका परंतु सतर्क रहा एच. एम. पी. व्ही.  आजाराबाबत लातूर मनपाचे आवाहन.

लातूर/प्रतिनिधी : ह्युमन मेटापन्यूमो ( एचएमपीव्ही ) व्हायरसच्या रुग्णांमध्ये चीन देशात वाढ होत आहे. या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सर्दी, खोकल्याच्या त्रासासोबत फ्लूसारखी लक्षणे आणि गंभीर स्वरूपामध्ये श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसून येतात. मुख्यतः प्रतिकारशक्ती कमी असणारे रुग्ण, लहान मुले आणि वृद्ध लोकांना याचा धोका अधिक आहे. चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमो (एचपीएमव्ही) व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने शेजारील देशांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने आयुक्‍त, बाबासाहेब मनोहरे व  उपायुक्‍त डॉ. पंजाबराव खानसोळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली ‘एचएमपीव्ही’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्‍यक उपाययोजना महानगरपालिका स्‍तरावर राबवीण्‍यात येत आहे.

‘एचएमपीव्ही’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लातूर मनपा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. घाबरू नका; पण सतर्क राहा, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत; तसेच सर्दी, खोकल्याच्या रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्याचे निर्देश आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी पत्राद्वारे दिले आहेत. यासोबत स्वच्छतेची नियमावली पाळण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. चीनमध्ये नोंदवलेल्या ‘एचएमपीव्ही’ प्रकरणांबाबत घाबरण्याची गरज नाही. आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. ‘एचएमपीव्ही’चा हा विषाणू तीव्र श्वसन संक्रमणाचे एक महत्त्वाचे कारण आहे आणि २००१ मध्ये नेदरलँडमध्ये पहिल्यांदा याची नोंद करण्यात आली होती. हा एक सामान्य श्वासोच्छ्रासाचा विषाणू आहे, जो प्रामुख्याने श्वसनमार्गाच्या संसर्गास कारणीभूत ठरत आहे.

एचएमपीव्ही विषाणू बाबत घाबरू नकाः-

राज्यातील श्वसन संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले यात वर्ष २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २४ मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापि खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनाचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळा. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे या गोष्टी टाळाव्या. एचएमपीव्ही विषाणूमुळे चिंतेचे कारण नाही, त्यापेक्षाही जास्त घातक आर. एस. व्ही व इंन्फुल्युपंझा विषाणु आहेत. त्यामुळे जनते मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये, या पार्श्वभूमीवर डॉ. शंकर भारती, वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य यंत्रणेला सर्दी खोकला चे रुग्ण सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहे.

हे करा :

■ जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.

■ साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.

■ ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.

■ भरपूर पाणी प्या. पौष्टिक खा

■ संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेशन होईल, याची दक्षता घ्या.

■ दररोज स्वच्छ रुमाल वापरा.

■ मास्‍कचा वापर करण्‍यात यावा.

■ जर ताप, खोकला आणि शिंका येत असेल तर लवकर वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घ्यावेत.

हे करू नये :

■ हस्तांदोलन

■ टिश्यू पेपरचा पुनर्वापर करू नये.

■ आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळा.

■ डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळा.

■ सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.

■ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.

हा व्‍हायरस साधारणस्‍वरूपाचा आहे. यामध्‍ये सर्दी, खोकला, ताप असू शकतो / फ्लुसारखी लक्ष्‍णे असतात. कांही रुग्‍णामध्‍ये प्रतिकार शक्‍ती कमी असल्‍यामुळे हा आजार लवकर होवू शकतो. तरी अशा स्‍वरूपाचे लक्षणे आढळल्‍यास नागरिकांनी आरोग्‍य विभाग, लातूर शहर महानगरपालिका, लातूर अंतर्गत कार्यरत नागरी प्राथमिक आरोग्‍य केंद्र आणि आयुष्‍मान नागरी आरोग्‍य केंद्र येथे वैद्यकीय अधिका-यांच्‍या सल्‍ल्‍यानुसार उपचार घ्‍यावेत असे अवाहन लातूर शहर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.शंकर भारती यांच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *